साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील मंगळग्रह मंदिरात श्री गणेशात्सवानिमित्त गणेश महायागाचे आयोजन केले होते. दुपारी १२ ते सायंकाळी ५ दरम्यान दोन सत्रात पार पडलेल्या महायागाचे विविध क्षेत्रातील ९ मानकरी सपत्नीक सहभागी झाले होते. गणेशोत्सवात यंंदा प्रथमच आयोजिलेल्या अतिशय चैतन्य व भक्तिमय वातावरणातील महायागावेळी हजारो भाविकांची साक्ष नेत्रदीपक ठरली.
मंगळग्रह देवाचा नऊ हा शुभांक मानला जातो. या पार्श्वभूमीवर गणेशाची आकर्षित अन् तितकीच मनोहारी उत्सवमूर्तीसह विविध फुलमाळांनी केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. महायागाच्या प्रारंभी गणपती पुण्याहवाचन मंडल, गौर्यादि मातृका मंडल, चतु:षष्ट योगिनी मंडल, वास्तु मंडल, क्षेत्रपाल मंडल, सर्वतोभद्र मंडल, सूर्यादि नवग्रह मंडल, चतुषष्टि भैरव देवता मंडल व ईशान्य रुद्र मंडल स्थापित करण्यात आले. त्यानंतर पाठांचे हवन करण्यात येऊन सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास महाआरतीने महायागाचा समारोप झाला. यासाठी मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, सौरभ वैष्णव, अक्षय जोशी व मेहूल कुलकर्णी यांनी महायाग विधी निरूपणासह पौरोहित्य केले. अंकुश जोशी यांनी नालवर साथसंगत केली.
यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, आनंद महाले, डी. ए. सोनवणे यांच्यासह मंदिरातील सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.