मला जाऊ द्या ना घरी! जी-२० परिषदेसाठी आलेल्या नायजेरियाच्या अध्यक्षांच्या स्वागताला मराठी लावणी

0
5

नवीदिल्ली : वृत्तसंस्था

येथे सुरु होत असणाऱ्या जी-२० परिषदेसाठी जगभरातील पाहुणे भारतात दाखल होत आहेत. या पाहुण्यांच्या स्वागताला भारतीय कला व संस्कृतीचे दर्शन घडवणारे खास कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले आहेत. काल, ६ सप्टेंबरला नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष ‘बोला अहमद टिनुबू’ २० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले. यावेळी नवी दिल्ली विमानतळावर टिनुबू यांच्या स्वागताची दृश्य सध्या व्हायरल होत आहेत. याच व्हिडिओची चर्चा रंगण्याचे खास कारण म्हणजे टिनुबू यांच्या स्वागताला चक्क मराठी लावणी सादर करण्यात आली आहे. दूरदर्शनच्या अधिकृत युट्युब अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.
टिनुबू यांच्या स्वागतासाठी मराठी लावणीला प्राधान्य देण्यात आले ही जरा अभिमानाची बाब असली तरी गाण्याची निवड पाहून मात्र नेटकरी पुरते बुचकळ्यात पडले आहेत. नटरंग सिनेमातील गाजलेली लावणी म्हणजेच ‘वाजले की बारा’ यावर नृत्य सादर करून टिनुबू यांचे स्वागत झाले. पण नेमकं आगमनालाच ‘जाऊ द्या ना घरी’ वाजल्याने नेटकऱ्यांमध्ये चांगलाच हशा पिकला आहे.
काही नेटकऱ्यांनी म्हटले की, लावणी जी महाराष्ट्राची सांस्कृतिक कला आहे. पण, निदान आणखी चांगली गाणी निवडायला हवी होती. आता त्यांना या गाण्याचा अर्थ समजावून सांगा म्हणजे त्यांना कळेल की तुम्हाला भारतात येतानाच निघून जायला सांगत आहेत तर एका युजरने कमेंट करताना, जर आपल्याला गणेश चतुर्थी किंवा अन्य धार्मिक सणांच्या वेळी अशी गाणी लावायला लाज वाटत नाही तर परदेशी पाहुण्यांना तर या गाण्याचा अर्थ कळणार नाही त्यांच्या स्वागताला अशी लावणी सादर करण्यात काहीच हरकत नसावी असा टोमणाही मारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here