मिल्लत कनिष्ठ महाविद्यालयात निबंध लेखनासह व्याख्यान

0
28

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

शहरातील मेहरूणमधील मिल्लत कनिष्ठ महाविद्यालय येथे हिंदी दिनाचे औचित्य साधून अतिथी व्याख्यान आयोजित केले होते. त्यासाठी इकरा एचजे थीम कला व विज्ञान महाविद्यालय, जळगाव येथील हिंदी विभागप्रमुख डॉ. राजेश भामरे यांनी ‘हिंदी भाषेत रोजगाराच्या संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी हिंदी भाषेचा थोडक्यात ऐतिहासिक आढावाही मांडला. मिल्लतचे माजी पर्यवेक्षक मुहम्मद रफिक पटवे यांनी हिंदी ही सर्वसामान्यांची भाषा असल्याचे सांगून तिची सहजता आणि सोयी सांगितल्या. हिंदी विभागप्रमुख शेख जय्यान अहमद यांनी हिंदी दिनाची रूपरेषा मांडली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. ज्याची सुरुवात ११ वीच्या मुहम्मद इस्माईलने या विद्यार्थ्याने पवित्र कुराण पठाणाने केली.

मस्कान शेख यांनी हमद आणि अनम खान यांनी नात सादर केली. इरम आरिफ खान आणि मिराज बशीरुद्दीन यांनी ‘हिंदी भाषा आणि हिंदी दिवसांचे महत्त्व’ विषयावर भाषण केले. ११वीच्या अल्मास सय्यद उस्मान या विद्यार्थिनीने कबीर आणि रहीम यांच्या हिंदी दोहे सादर करून दाद मिळविली. तसेच मुबशेरा शेख व जरनैन शाह यांनी हिंदी उर्दू भाषेचा गोडवा गिताद्वारे सादर केले. हुनर फातेमा आणि तिच्या सहकाऱ्यांनी ‘हिंदी मुहावरे’ वर नाटीका सादर केली.

अध्यक्षीय भाषणात मिल्लत ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या अफिफा शाहीन यांनी हिंदी विभागाच्या शिक्षकांचे कौतुक केले. तसेच आपले विचार व्यक्त करण्यासाठी हिंदी हे सर्वोत्तम माध्यम असल्याचे सांगितले. व्याख्यानात मिल्लतचे पर्यवेक्षक सय्यद मुख्तार, मिल्लत कनिष्ठ महाविद्यालयाच्या उर्दू विभागाच्या सुमय्या शाह, मराठी विभागाचे वसीम अब्दुल हमीद, अकीफ शेख, इंग्रजी विभागाचे सय्यद आसिफ, विज्ञान विभागाचे साजिद खान आदी उपस्थित होते.

१० विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहन पारितोषिक

यापूर्वी हिंदी निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी ‘मी अनुभवलेला शिक्षक दिन’ व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या कोणत्याही विषयावर ठराविक वेळेत निबंध लिहिण्यास सांगण्यात आले. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी नमूद केलेल्या विषयाव्यतिरिक्त पर्यावरण संरक्षण, मातृ-पितृ प्रेम, चांद्रयान या विषयांवरही निबंध लिहिले. यामध्ये १० विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहन पारितोषिक देण्यात आली तर प्रथम पारितोषिक ११ वीतील अलिजा शेख जावेद, द्वितीय पारितोषिक मस्कान हुसेन शाह आणि खान शिफा इम्रान यांना संयुक्तरित्या तर तृतीय पारितोषिक मेअराज शेख बशीरुद्दीन यांना देण्यात आले. इंग्रजी विभागाच्या प्रभारी फरहाना यांनी हिंदी भाषेत मनोगत व्यक्त करून उपस्थितांची दाद मिळविली. कार्यक्रम व स्पर्धेच्या आयोजनासाठी हिंदी विभागाचे प्रमुख शेख जय्यान अहमद यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन १२ वीचा विद्यार्थी शाह मस्कान हुसेन याने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here