भुसावळ बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
साईमत/भुसावळ / प्रतिनिधी :
ऑनलाइन व्यवहाराच्या नावाखाली विश्वास संपादन करून भुसावळ येथील एका ज्येष्ठ वकिलाची १० हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.
भुसावळ शहरातील जामनेर रोड परिसरात राहणारे आणि वकिली व्यवसाय करणारे ५८ वर्षीय अॅड. संजय व्ही. तेलगोटे यांना संशयित आरोपी जिमी जोसेफ (पूर्ण नाव व पत्ता अद्याप अज्ञात) याने ऑनलाइन व्यवहाराच्या बहाण्याने गंडा घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
ही घटना १७ जुलै २०२५ रोजी दुपारी साधारण दोन वाजता भुसावळ येथे घडली होती. आरोपी जिमी जोसेफ याने फिर्यादी अॅड. तेलगोटे यांचा विश्वास संपादन करत विविध कारणे सांगून त्यांच्याकडून १० हजार रुपये उकळले. काही काळानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.
दरम्यान, तब्बल दीर्घ कालावधीनंतर म्हणजेच २७ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणाची अधिकृत नोंद करण्यात आली. त्यानंतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी जितेंद्र पाटील करत असून आरोपीचा शोध सुरू आहे. ऑनलाइन व्यवहाराच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.
