डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: जळगाव रेल्वे स्थानकावर अभिवादन सोहळा
साईमत जळगाव प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे जळगाव रेल्वे स्थानक परिसरातील त्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित समाजबांधवांनी बाबासाहेबांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक वंदन करत त्यांचे विचार आत्मसात करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच भारतीय संविधान निर्मितीतील महान योगदानाची सविस्तर आठवण करून देण्यात आली. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजात समानता, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांची जोपासना करण्याचा सामूहिक संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
तसेच, कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार अधिक व्यापक पातळीवर करण्याचे आवाहन करण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत त्यांचे विचार पोहोचावेत, यासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश बागडे, सचिव राहुल नेतलेकर, वीर दहियेकर, संदीप गारुंगे, गणेश बागडे, कार्तिक बाटूंगे, राहुल दहियेकर यांच्यासह अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
