साईमत, जामनेर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येत्या शुक्रवारी, १५ फेब्रुवारी ते ३० एप्रिलपर्यंत ना. गिरीष महाजन यांच्या प्रेरणेने कमल फाउंडेशनतर्फे आयोजित कमल हॉस्पिटल व मॅटर्निटी होम येथे भव्य रोगनिदान तथा शस्त्रक्रिया शिबिर द्वैमासिक सप्ताहाचे आयोजन केले आहे.
शिबिरात संपूर्ण दोन महिने रुग्णांच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया तसेच विविध आजारांवर मोफत तसेच अल्पदरात उपचार केले जातील. त्यात जे उपचार व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण आरोग्य योजनेअंतर्गत येत असतील तर ते संपूर्णपणे मोफत केले जातील. तसेच ज्या रुग्णांकडे प्रायव्हेट विमा कंपन्यांचे कॅशलेस हेल्थ कार्ड असतील त्यांनाही संपूर्णपणे कॅशलेस सुविधा दिल्या जातील. त्याचप्रमाणे ज्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया वरील कोणत्या योजनेत बसत नसतील अशा रुग्णांच्या शस्त्रक्रिया अत्यंत अल्पदरात केल्या जातील.
शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च असा
गर्भवती महिलांसाठी खास सवलतीच्या दरात उपचार केले जातील. त्यात महिलांसाठी सोनोग्राफी २०० रुपये, नॉर्मल डिलिव्हरी सहा हजार रुपये, स्तनातील गाठ आठ हजार रुपये, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया नऊ हजार रुपये, सिझेरियन १५ हजार रुपये, पित्ताशयातील खडे २२ हजार रुपये, गर्भपिशवीचे ऑपरेशन १५ हजार रुपये, हायड्रोसील १२ हजार रुपये, गर्भपिशवीचे ऑपरेशन दुर्बिणीद्वारे २५ हजार रुपये मुळव्याध किंवा भगंदर १२ हजार रुपये, अपेंडिक्स ऑपरेशन १४ हजार रुपये सर्व प्रकारच्या गाठी चार हजार रुपये, हर्निया १४ हजार रुपये असा खर्च असणार आहे.
शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन
शिबिरात सर्व प्रकारचे कॅन्सर निदान आणि शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत होणारे मोफत ऑपरेशन प्रोस्टेट तसेच हात किंवा पायाचे हाड मोडणे त्याचे ऑपरेशन मोफत केले जाईल. त्याचप्रमाणे शुगर, ब्लडप्रेशर, पोटाचे विकार, लकवा, किडनी संबंधित आजारांसाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतील. शिबिराचा तालुक्यातील गरजूंनी अवश्य लाभ घेण्याचे आवाहन डॉ. प्रशांत भोंडे (महाराष्ट्र प्रदेश भाजपा वैद्यकीय आघाडी सहसंयोजक, वैद्यकीय आघाडी जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष, जामनेर कमल हॉस्पिटल व मॅटर्निटी होमचे संचालक) यांनी केले आहे.