सोन्या-चांदीसह रोकड लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
शहरात घरफोडीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून वाघनगर परिसरातील राजे संभाजी चौकात चोरट्यांनी एका रात्रीत तीन घरांना लक्ष्य करून मोठा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे.
वाघनगर येथील राजे संभाजी चौकात परिसरात चोरट्यांनी दोन बंद घरांचे कडीकोयंडे तोडून प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने व रोकड मिळून सुमारे ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तिसऱ्या घरात मात्र त्यांना काहीही हाती लागले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कुटुंबाचे अलीकडेच नवीन घरात स्थलांतर सुरू होते. घर बदलण्याच्या गडबडीत जुने घर बंद असतानाच चोरट्यांनी संधी साधत दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली.
याच भागातील दुसऱ्या बंद घरातही चोरट्यांनी हात साफ करत चांदीच्या मूर्ती आणि रोकड चोरली. तर तिसऱ्या घरात चोरीचा प्रयत्न अपयशी ठरला आणि चोरटे रिकाम्या हाताने पसार झाल्याचे समजते.
एका रात्रीत सलग तीन घरफोड्या झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. विशेषतः सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबे बाहेरगावी जात असल्याने बंद घरांना लक्ष्य केले जात असल्याची चर्चा जोरात आहे.
दरम्यान, या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून ही चोरी सराईत टोळीने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनांमुळे पोलिसांनी गस्त वाढवावी आणि बंद घरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पुढील तपासात या चोरट्यांचा माग लागतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
