१५ लाखांचे ११० मोबाईल नागरिकांना परत
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
हरवलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल शोधून काढण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले असून, तब्बल १५ लाख रुपयांहून अधिक किमतीचे ११० मोबाईल शोधून मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. आधुनिक सायबर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत जिल्हा पोलिसांनी ही उल्लेखनीय कारवाई केली असून, नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे आणि सायबर सेलने समन्वयाने ही मोहीम राबवली. मोबाईल हरविल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर अनेक नागरिकांना आपला मोबाईल परत मिळण्याची आशा नसते. मात्र, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल ट्रॅकिंग आणि सायबर तपासाच्या माध्यमातून हे आव्हानात्मक काम यशस्वीपणे पूर्ण केले.
या मोहिमेत भुसावळ उपविभागाने सर्वाधिक कामगिरी केली. भुसावळ शहर, बाजारपेठ, तालुका आणि नशिराबाद पोलीस ठाण्यांच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण ६८ मोबाईल हस्तगत करण्यात आले. या मोबाईलची अंदाजे किंमत ९ लाख ४४ हजार ४९८ रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.
तसेच मुक्ताईनगर उपविभागातील बोदवड, सावदा आणि वरणगाव पोलीस ठाण्यांनीही उल्लेखनीय कामगिरी बजावत ४२ मोबाईल शोधून काढले. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे ५ लाख ७५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
मोबाईल परत मिळाल्यानंतर अनेक नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले. काही नागरिकांनी तर हरवलेला मोबाईल पुन्हा मिळेल, अशी अपेक्षाच सोडून दिली होती. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि तांत्रिक कौशल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला.
दरम्यान, जिल्हा पोलिसांनी नागरिकांना मोबाईल हरवल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर सेलमध्ये तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रत्येकाने आपल्या मोबाईलचा IMEI क्रमांक सुरक्षित ठेवावा, जेणेकरून तपास प्रक्रियेत मदत होईल, असा सल्लाही पोलिस प्रशासनाने दिला आहे.
