पूरस्थितीसाठी मनपाची पूर्वतयारी
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
येणाऱ्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती, पाण्यातील अपघात तसेच आपत्कालीन परिस्थितींचा सामना करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने सज्जतेचे पाऊल उचलले आहे. याच अनुषंगाने महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार मंगळवारी मेहरूण तलाव परिसरातील गणेश घाट येथे अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाच्या वतीने शोध व बचाव साहित्याचे विशेष प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.
सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत झालेल्या या सरावामध्ये पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संकटपरिस्थितीत बचाव पथकाची तत्परता, समन्वय आणि कार्यक्षमतेची कसोटी घेण्यात आली. पाण्यात अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, त्यांना सुरक्षित बाहेर काढणे तसेच विविध बचाव उपकरणांचा प्रभावी वापर कसा करावा, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.
या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नरवीर रावळ आणि केंद्र अग्निशमन अधिकारी भारत बारी यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत बचाव कार्याची विविध तांत्रिक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
सरावामध्ये अग्निशमन दलाचे वाहन चालक प्रकाश चव्हाण, निवांत इंगळे, देविदास सुरवाडे, अजय पाटील, भूषण पाटील तसेच तेजस जोशी, सौरभ चिकटे, केतन पाटील, रजनीश भावसार आणि चेतन सपकाळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. विविध उपकरणांचा वापर, दोरीच्या सहाय्याने बचाव, तसेच जलद प्रतिसाद देण्याच्या पद्धती यांचा सराव करण्यात आला.
या वेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी जळगाव मनपा अग्निशमन दल पूर्णपणे सज्ज असून नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. अशा प्रात्यक्षिकांमुळे बचाव यंत्रणेची तयारी अधिक मजबूत होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
