महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण परिसरात पाहणी
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
येत्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरात पावसाचे पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जळगाव महानगरपालिकेने पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाला मोठा वेग दिला आहे. शहरातील जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रशासनाने व्यापक स्तरावर स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, या कामांचा आढावा महापौर दीपमाला काळे यांनी बुधवारी मेहरुण परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन घेतला.
मेहरुण परिसरात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाची पाहणी करताना महापौरांनी नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कचरा आणि अडथळे तातडीने हटवून पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. शहरातील ज्या भागांमध्ये पावसाळ्यात वारंवार पाणी साचण्याच्या तक्रारी येतात, त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
महापौरांच्या निर्देशानंतर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कामाचा वेग वाढवत विविध भागांत स्वच्छता मोहीम अधिक तीव्र केली आहे. सहाय्यक उपायुक्त उदय पाटील आणि मुख्य आरोग्य निरीक्षक रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहरुण, छत्रपती शिवाजीनगर तसेच रामदास कॉलनी परिसरात नालेसफाईची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. काही ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने नाल्यांतील गाळ काढण्यात येत असून, कचऱ्याचे निर्गमनही करण्यात येत आहे.
प्रभाग क्रमांक १२ मधील रामदास कॉलनी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून नाल्यांची सखोल साफसफाई करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजीनगर भागातही मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ आणि कचरा उपसण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
या संपूर्ण मोहिमेसाठी महानगरपालिकेकडून सहा जेसीबी आणि एक पोकलँड यंत्र तैनात करण्यात आले असून, आवश्यक मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात कार्यरत ठेवण्यात आले आहे. जलनिस्सारण मार्ग मोकळे ठेवणे आणि शहरात पावसाचे पाणी साचू नये यासाठी ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनीही नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे, अन्यथा नाले तुंबण्याच्या समस्या अधिक गंभीर होऊ शकतात, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
या पाहणी दौऱ्यात महापौर दीपमाला काळे यांच्यासह उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, गणेश सोनवणे, सहाय्यक उपायुक्त उदय पाटील, मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे आणि समीर बोरोले उपस्थित होते. सर्व अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणच्या कामांचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या.
महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की, शहरातील कोणत्याही भागात पावसाचे पाणी साचू नये यासाठी नालेसफाईचे काम वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असून, ही मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे.
