साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगाव शहरातील खोटे नगर परिसरातील धनश्री नगरात असलेल्या एका खुल्या भूखंडावरून (Open Space) वाद उफाळून आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी सत्तेचा गैरवापर करत महापालिकेच्या मालकीचा हा भूखंड शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली बळकावल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते ॲड. पीयूष पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान, हे सर्व आरोप विष्णू भंगाळे यांनी फेटाळून लावले असून, उच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रवेश केल्यास धमकावले जाते; नागरिकांचा आरोप
या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ॲड. पीयूष पाटील यांनी विष्णू भंगाळे यांच्यावर थेट निशाणा साधला. महापालिकेच्या मालकीचा हा खुला भूखंड असतानाही, सत्तेच्या बळावर शैक्षणिक संस्थेच्या नावाखाली त्यावर ताबा मिळवला गेला आहे, असा आरोप त्यांनी केला. स्थानिक नागरिकांनी देखील यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या खुल्या भूखंडाचा वापर करू दिला जात नाही आणि तिथे प्रवेश केल्यास धमकावले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
माजी महापौर विष्णू भंगाळे यांचे प्रत्युत्तर; नागरिकांना दिले ‘हे’ आव्हान
या सर्व आरोपांवर माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले, “महापालिकेने ही जागा नियमानुसार शैक्षणिक संस्थेसाठी दिली आहे. नागरिकांच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाने (हायकोर्ट) माझ्या बाजूने निकाल दिला असून, माझ्यावरील सर्व आरोप पूर्णपणे चुकीचे आणि राजकीय द्वेषातून प्रेरित आहेत.”
ॲड. पीयूष पाटील हे वैयक्तिक द्वेषापोटी लोकांना भडकवून आरोप करत असल्याचा पलटवार त्यांनी केला. “शहरात अनेक संस्था असताना त्यांना फक्त माझीच संस्था कशी दिसली?” असा सवालही भंगाळे यांनी उपस्थित केला. तसेच, स्थानिक नागरिकांनी महादेवाची किंवा स्वतःच्या मुलांची शपथ घेऊन सांगावे की, या भूखंडावर त्यांना लग्न किंवा इतर कार्यक्रमांसाठी वापर करू दिला की नाही? असे थेट आव्हानही भंगाळे यांनी रहिवाशांना दिले आहे.
या वादामुळे खोटे नगर परिसरातील धनश्री नगरात सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात हा वाद काय वळण घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
