जळगाव शहरातील महामार्गाच्या अधिकारक्षेत्राचा धक्कादायक घोळ समोर; गतिरोधक आणि सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी मनसे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांचा आंदोलनाचा इशारा
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगाव शहरातील अजंठा चौफुली ते सुप्रीम कॉलनी (एमआयडीसी मार्ग) या सतत अपघात घडणाऱ्या मार्गावर तातडीने गतीरोधक व इतर वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगावच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन देण्यात आले आहे. मात्र, या निवेदनानंतर एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक माहिती समोर आली असून, प्रशासकीय विसंगतीचा मोठा नमुना उघडकीस आला आहे.
नेमका काय आहे प्रशासकीय घोळ?
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाची जळगाव स्थानिक विभागाची हद्द अवघी अडीच किलोमीटर आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यापुढील संपूर्ण रस्ता थेट राष्ट्रीय महामार्ग विभाग, जालना यांच्या अखत्यारीत येतो. एकाच शहरातील रस्ता, तिथलेच अपघात आणि तिथलेच नागरिक असताना, त्याची जबाबदारी मात्र दुसऱ्या जिल्ह्याकडे सोपवण्यात आली आहे. यामुळे जळगावकरांच्या रस्त्याच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी थेट जालना येथे जाऊन तक्रारी करायच्या का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
नागरिकांचा जीव मुठीत; मोठ्या अपघाताची भीती
अजंठा चौफुली, कस्तुरी हॉटेल, आर. एल. चौफुली, पोलीस कॉलनी चौक, जळगाव वजन काटा आणि ममता बेकरी या परिसरात भरधाव वाहनांमुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. या ठिकाणी आतापर्यंत अनेक किरकोळ अपघात घडले असून, एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती कायम आहे. मात्र, दोन जिल्ह्यांच्या तांत्रिक अधिकारक्षेत्राच्या घोळामुळे प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीये.
एखाद्याचा जीव गेल्यावर जाग येणार का? – मनसे
या गंभीर परिस्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. एखाद्या निष्पाप नागरिकाचा किंवा विद्यार्थ्याचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला गतिरोधक बसविण्याची जाग येणार का? असा सवाल मनसेने केला आहे. प्रशासनाने अपघात होण्याची वाट न पाहता तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या संपूर्ण विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असून, जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासकीय अधिकारक्षेत्राबाबत स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी करणार आहे. जळगावकरांना स्वतःच्या शहरातील रस्त्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात हेलपाटे मारावे लागणार असतील, तर ही व्यवस्था बदललीच पाहिजे, अशी भूमिका मनसेने घेतली आहे.
येत्या सात दिवसांत या मार्गावर गतिरोधक, सूचना फलक, रोड मार्किंग व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक नागरिकांसह रस्त्यावर उतरून ‘तीव्र लोकशाही आंदोलन’ करेल, असा स्पष्ट इशारा मनसे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांनी दिला आहे. तसेच त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, आशुतोष जाधव, चेतन पवार, शाखा अध्यक्ष युसुफ खाटीक, राजेश मराठे, खुशाल ठाकूर, शकील शेख, बादशाह शाह, दीपक राठोड, लक्ष्मी भील यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
