भव्य शोभायात्रा, ताळ-मृदंगाचा गजर अन् महाप्रसादाने जयंती उत्साहात साजरी
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
संत शिरोमणी सेना महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात गुरुवारी भक्तीमय वातावरणात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. नाभिक समाजाच्या वतीने आयोजित या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यात समाजबांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. ताळ-मृदंगाचा गजर, जयघोष, आकर्षक रांगोळ्या आणि डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई यामुळे संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
शोभायात्रेची सुरुवात कालिंका माता मंदिरापासून करण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते संत शिरोमणी सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली. “संत सेना महाराज की जय”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने आरतीत सहभाग घेत वातावरण अधिक मंगलमय केले.
कालिंका माता मंदिरापासून निघालेली शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. मार्गभर विविध ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी व जलपानाद्वारे शोभायात्रेचे स्वागत केले. काही ठिकाणी महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून संत सेना महाराजांना अभिवादन केले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिगीतांच्या स्वरांत संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
युवकांनी डीजेच्या तालावर उत्स्फूर्त नृत्य सादर करत शोभायात्रेला रंगत आणली, तर अबालवृद्धांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. शोभायात्रेचा समारोप पांझरापोळ गोशाळा येथे करण्यात आला. त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या जयंती सोहळ्यात नाभिक समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला-पुरुष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष जगन्नाथ वखरे, उपाध्यक्ष कांतीलाल वाघ, रमेश शिंदे, जिल्हा युवा उपाध्यक्ष मनोज बिडे, कृष्णा अहिराणे यांच्यासह समाजबांधवांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्याने शहरात भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला गेला.
