‘शासनाचा मूळ उद्देश धुळीस मिळतोय’; प्रशासकीय विकेंद्रीकरणासाठी कार्यालय नशिराबाद येथेच सुरू करण्याची मागणी
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले नवीन अपर तहसील कार्यालय जळगाव शहरात स्थापन करण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेवर आता तीव्र आक्षेप घेतला जात आहे. हे कार्यालय जळगाव शहरात न करता भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती आणि ग्रामीण नागरिकांच्या सोयीचे असलेल्या नशिराबाद येथेच स्थापन करावे, अशी आक्रमक मागणी नशिराबाद नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पंकज शामकांत महाजन यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आज थेट जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर पत्र पाठवून या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात पंकज महाजन यांनी नमूद केले की, “उपविभागीय दंडाधिकारी जळगाव कार्यालयाने १० जुलै २०२६ रोजी पत्र काढून आमच्या हरकती निकाली काढल्या आहेत. मात्र, हा निर्णय घेताना शासनाच्या धोरणाचा मूलभूत उद्देश, प्रशासकीय विकेंद्रीकरणाचे तत्त्व आणि ग्रामीण नागरिकांच्या सोयींचा कुठलाही विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे या निर्णयाचा तातडीने फेरविचार होणे अत्यंत गरजेचे आहे.”
पंकज महाजन यांचे मुख्य आक्षेप आधीच सर्व कार्यालये जळगावमध्ये: जळगाव शहरात सध्या तहसील कार्यालयासह जिल्हा व तालुक्याची सर्व प्रमुख शासकीय कार्यालये कार्यरत आहेत. अशा स्थितीत पुन्हा नवीन अपर तहसील कार्यालय जळगाव शहरातच सुरू केल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा कोणताही अतिरिक्त लाभ मिळणार नाही.
प्रशासकीय विकेंद्रीकरण शून्य: शासनाने स्वतंत्र अपर तहसील कार्यालय मंजूर करण्यामागील मूळ हेतू हा प्रशासनाचे विकेंद्रीकरण करणे आणि ग्रामीण नागरिकांचा वेळ व पैसा वाचवणे हा होता. जळगाव शहरातच हे कार्यालय राहिल्यास हा उद्देश पूर्णपणे निष्प्रभ होईल.
नशिराबादच योग्य पर्याय: सदर अपर तहसील कार्यालयाचा कार्यक्षेत्र नशिराबाद, कानळदा, भोकर, आसोदा, शिरसोली आणि म्हसावद या महसुली मंडळांशी संबंधित आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार करता नशिराबाद हे या सर्व गावांना मध्यवर्ती आहे.
नशिराबाद हे राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने इदगाव, भोकर, कानळदा, आसोदा, ममुराबाद या भागातील नागरिकांना कमी वेळात नशिराबाद येथे पोहोचणे शक्य आहे. तसेच कुसुंबा, उमाळा, कंडारी, धानवड, चिंचोली या गावांना जोडणारे रस्ते उपलब्ध असल्याने या भागातील नागरिकांनाही नशिराबाद अत्यंत सोयीचे ठरणार आहे. पाथरी, म्हसावद, बोरनार येथील रहिवासीही राष्ट्रीय महामार्गाने नशिराबादला सहज पोहोचू शकतात.
”जर नवीन कार्यालय जळगाव शहरातच ठेवायचे असेल, तर आधीच अस्तित्वात असलेल्या तहसील कार्यालयामध्येच मनुष्यबळ वाढवून काम करता आले असते,” असा थेट सवाल महाजन यांनी उपस्थित केला आहे. आता उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांच्या या पत्रानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य शासन नशिराबादकरांच्या या न्याय्य मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
