मनपाचा दणका जळगावातील १२ व्यावसायिकांवर कारवाई, १० हजारांचा दंड
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवर होणाऱ्या अतिक्रमणांच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पुन्हा एकदा कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी सकाळी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत जुन्या सानेगुरुजी रुग्णालय परिसर आणि जुन्या कापड बाजारातील मसाला गल्ली भागात रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या १२ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत संबंधितांकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरातील विविध भागांमध्ये रस्त्याच्या जागेवर व्यवसाय उभारल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे वारंवार प्राप्त होत होत्या. विशेषतः जुन्या सानेगुरुजी रुग्णालयासमोरील भागात फुले, पान आदी वस्तू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमुळे वाहनांच्या ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सकाळी लवकरच कारवाईला सुरुवात केली. मोहिमेदरम्यान रस्त्यावर उभारलेले अनधिकृत व्यवसाय हटविण्यात आले. जुन्या सानेगुरुजी रुग्णालयासमोरील परिसरातील आठ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर जुन्या कापड बाजारातील मसाला गल्लीमध्ये रस्त्याचा वापर करून व्यवसाय करणाऱ्या चार दुकानदारांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या या मोहिमेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, रस्त्यावरील अडथळे दूर झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला. वाहतुकीचा सुरळीत प्रवाह कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेचे नागरिकांनी स्वागत केले.
ही कारवाई अतिक्रमण अधीक्षक संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन पथकाने केली. शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी अतिक्रमणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेता भविष्यातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, केवळ कारवाईपुरते मर्यादित न राहता शहरातील रस्ते कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी महापालिकेने नियमित देखरेख ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. वाहतुकीची शिस्त आणि नागरिकांच्या सुविधेसाठी रस्ते मोकळे ठेवणे आवश्यक असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
