‘बालविवाह करणार नाही, होऊ देणार नाही’; विद्यार्थ्यांनी घेतली सामाजिक जबाबदारीची प्रतिज्ञा
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
बालविवाह ही सामाजिक समस्या दूर करण्यासाठी कायद्याची माहिती आणि जनजागृती अत्यंत महत्त्वाची असून, याच उद्देशाने प्रविण पाटील फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी बालविवाह प्रतिबंधक कायद्यावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम, कायदेशीर तरतुदी तसेच बालविवाह रोखण्यासाठी प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रवीण पाटील यांनी सांगितले की, मुलीचे विवाहाचे कायदेशीर किमान वय १८ वर्षे, तर मुलाचे २१ वर्षे आहे. या वयापूर्वी विवाह करणे, लावणे किंवा त्यासाठी मदत करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. बालविवाहामुळे मुलांचे शिक्षण अपूर्ण राहते, त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासावर परिणाम होतो तसेच विशेषतः मुलींना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
बालविवाहामुळे लहान वयातच मुलींवर मातृत्वाची जबाबदारी येते. यामुळे त्यांच्या शिक्षण, करिअर आणि सामाजिक प्रगतीच्या संधी कमी होतात. त्यामुळे प्रत्येकाने बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना आवाहन करताना प्रवीण पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करून सक्षम नागरिक बनावे. आपल्या परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने पालक, शिक्षक, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, महिला व बाल विकास विभाग किंवा चाइल्ड हेल्पलाईन १०९८ यांच्याशी संपर्क साधावा.
कार्यक्रमात बालहक्क, मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व, लैंगिक समानता, कायद्याचा आदर आणि सामाजिक जबाबदारी या विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना प्रवीण पाटील यांनी समर्पक उत्तरे देत, बालविवाहमुक्त समाज निर्मितीसाठी युवकांची भूमिका निर्णायक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी “बालविवाह करणार नाही, होऊ देणार नाही आणि अशी कोणतीही घटना आढळल्यास संबंधित यंत्रणेला माहिती देऊ” अशी सामूहिक प्रतिज्ञा घेतली. या जनजागृती उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बालविवाहाविरोधातील सामाजिक लढ्यात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम प्रभावी ठरत असून, समाजात सकारात्मक बदल घडविण्यास मदत होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
