साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील गोरनाळे येथील रहिवासी, जामनेरचे माजी तालुका कृषी अधिकारी तथा सध्या पाचोरा तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांची आकाशवाणी केंद्र जळगाव येथे ‘शेतशिवार’ कार्यक्रमात ‘हवामान आधारित शेती एक काळाची गरज’ विषयावर लाईव्ह मुलाखत येत्या बुधवारी, २८ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजता प्रक्षेपित होणार आहे. जामनेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुलाखतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रमेश जाधव यांच्यावतीने केले आहे.
ते म्हणाले की, दिवसेंदिवस बदलत्या हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्याचा थेट परिणाम हा उत्पादन व उत्पन्नावर होत असतो. त्यातच शेतमालाचे बाजारभाव स्थिर किंवा निश्चित नसल्याकारणाने शेतमालाला योग्य दरही मिळत नाहीत. या सर्व बाबींवर मात करणे हे शेतकऱ्यांसमोर आव्हान ठरले आहे. रमेश जाधव हे स्वतः हाडाचे शेतकरी असलेले व शेतकऱ्यासंबंधित अतिशय संवेदनशील असलेले कृषी विभागातील पाचोरा तालुका कृषी अधिकारी आहेत. यापूर्वी ते जामनेर येथे तालुका कृषी अधिकारी होते.
जाधव हे नेहमीच आपल्या स्वतःच्याच शेतीत नवनवीन प्रयोग करीत असतात. त्यातूनच स्वतःच्याच अनुभवातून त्यांनी आपल्या गोरनाळे येथील शिवारातील प्रतिकूल असलेल्या माळरानसारख्या शेतीत हवामान अनुकूल अशी शेती पद्धती साकारली. त्या अनुभवातूनच अनुभव सिद्ध अशी माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी येत्या बुधवारी त्यांची आकाशवाणी जळगाव केंद्र येथील किशोर पवार आणि किशोरी वाघुळदे यांनी खास शेतकऱ्यांसाठी ‘शेतशिवार’ कार्यक्रमात लाईव्ह मुलाखत प्रसिद्ध कऱण्यात येणार आहे. ही माहिती तालुक्यातील शेतकऱ्यांनी जरूर ऐकून आपल्या शेतीसाठी उपयोगात आणावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.