विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचा एल्गार; विविध कथित घटनांवरून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
साईमत जळगाव प्रतिनिधी :
शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने ‘कॉर्पोरेट जिहाद’ विरोधात बुधवारी (दि. २२ एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत देशाचे राष्ट्रपती यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी विविध मुद्द्यांवर आवाज उठवत देशात कथित जिहादी मानसिकतेशी संबंधित प्रकरणे विविध स्तरांवर समोर येत असल्याचा आरोप केला. विशेषतः कॉर्पोरेट क्षेत्रातही अशा प्रवृत्तींचा प्रभाव वाढत असल्याचा दावा करत या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
निवेदनात नाशिकमधील टीसीएस कंपनीशी संबंधित प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला असून, सुशिक्षित आणि व्यावसायिक क्षेत्रातही अशा प्रकारच्या घटनांची नोंद होत असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच उत्तर प्रदेशातील काही घटनांचा संदर्भ देत हिंदू मुलींना लक्ष्य करून कथित लैंगिक शोषण झाल्याचे आरोप मांडण्यात आले. या घटनांमुळे समाजात भीती व अस्वस्थता निर्माण होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
याशिवाय, अल फलाहा युनिव्हर्सिटीशी संबंधित कथित दहशतवादी कनेक्शनचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. काही शैक्षणिक संस्थांबाबत संशय व्यक्त करत त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. देशातील विविध भागांमध्ये ‘लँड जिहाद’च्या माध्यमातून अवैध अतिक्रमण होत असल्याचा आरोप करत सार्वजनिक व सरकारी जमिनींचे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
खानपानाशी संबंधित बाबींमध्येही काही गैरप्रकार होत असल्याचा आरोप करत नागरिकांच्या धार्मिक भावना व आरोग्याशी खेळ केला जात असल्याची चिंता आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या सर्व प्रकारांमुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
बजरंग दलाने राष्ट्रहितासाठी सातत्याने कार्यरत राहण्याची भूमिका अधोरेखित करत अशा कथित प्रवृत्तींचा समूळ नाश करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. या आंदोलनाद्वारे राष्ट्रपतींना तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन करण्यात आले.
या वेळी जिल्हाध्यक्ष हरीश मुंदडा, विभाग मंत्री देवेंद्र भावसार, जिल्हा मंत्री राकेश लोहार, महानगर मंत्री किरण पराशर, हरीश कोल्हे, यश पांडे, विद्यार्थिनी आस्था पाटील यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडले असून, प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
