जनरल अरुण वैद्य यांच्या शौर्याला जळगावची अनोखी मानवंदना
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
“देशाच्या संरक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या एका महान सेनापतीच्या नावाने चौक उभारून केवळ फलक लावणे पुरेसे नाही; त्या नावाला साजेसा इतिहास आणि शौर्यही त्या चौकात दिसले पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जळगाव येथील जनरल अरुण वैद्य चौक (आकाशवाणी चौक) येथे भारतीय सैन्याचा सेवामुक्त रणगाडा उभारण्याची जोरदार मागणी केली आहे. या संदर्भात मनसेच्या वतीने मनपा आयुक्तांना जाहीर निवेदन देण्यात आले असून प्रशासनाने टाळाटाळ केल्यास मनसे लोकसहभागातून रणगाडा उभारेल, असा थेट इशाराही दिला आहे.
शौर्याचा सन्मान करणारा चौक हवा; मनसेची ठाम भूमिका
या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी सांगितले की, जनरल अरुण वैद्य हे भारतीय सैन्याच्या इतिहासातील पराक्रम, धैर्य आणि नेतृत्वाचे तेजस्वी पर्व आहेत. त्यांच्या नावाने असलेल्या चौकात रणगाडा उभारणे ही केवळ सजावट नसून राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक सैनिकाला वाहिलेली कृतज्ञ आदरांजली ठरेल.यापूर्वी या चौकाचे नामकरण झाल्यानंतर दोन्ही बाजूंना दोन लहान तोफा बसविण्यात आल्या होत्या. त्या पाहून नागरिकांना भारतीय सैन्याच्या पराक्रमाची आठवण होत असे. मात्र, सद्यस्थितीत त्या तोफा तिथे नसल्याने चौकाच्या नावाला साजेशी ओळख आणि प्रेरणादायी स्वरूप हरवले असल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे.
’प्रशासनाला जमत नसेल तर आम्ही करून दाखवू’
देशातील अनेक शहरांमध्ये सेवामुक्त रणगाडे, तोफा आणि लढाऊ विमाने सार्वजनिक ठिकाणी उभारून राष्ट्रप्रेमाची जाणीव जपली जाते. जळगाव शहरातही असे प्रेरणादायी स्मारक असणे काळाची गरज आहे.
मनसेने मनपा प्रशासनाला संरक्षण मंत्रालय आणि भारतीय सैन्याशी आवश्यक तो समन्वय साधून सेवामुक्त रणगाडा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच, मनपा प्रशासनाला निधी किंवा इतर कोणतीही अडचण असल्यास, महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसहभागातून निधी उभारून सर्व कायदेशीर प्रक्रिया स्वतः पूर्ण करेल आणि हा रणगाडा जळगावमध्ये आणेल, असा निर्धार मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
”शहरातील चौक हे फक्त वाहतुकीचे केंद्र नसून ते शहराचा इतिहास, संस्कृती आणि स्वाभिमान सांगणारे जिवंत स्मारक असतात. रणगाडा हा केवळ लोखंडाचा ढीग नाही; तो भारतीय सैनिकांच्या अदम्य शौर्याचा, त्यागाचा आणि राष्ट्ररक्षणाच्या अखंड संकल्पाचा जिवंत इतिहास आहे. शौर्याचा सन्मान करणारे शहरच पुढील पिढीला देशभक्तीची खरी प्रेरणा देऊ शकते.”
— ॲड. जमील देशपांडे, जिल्हाध्यक्ष, मनसे.
या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळले, उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, चेतन पवार आणि शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
