नागरिकांच्या त्रासाची दखल महामार्गावरील जलकोंडी हटवण्यासाठी गटारीचे काम सुरू
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर आता कायमस्वरूपी उपाययोजना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अग्रवाल हॉस्पिटल चौफुली परिसरात दरवर्षी पावसाचे पाणी साचून वाहतूक विस्कळीत होत होती. या त्रासातून नागरिक आणि वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अखेर निचरा व्यवस्थेचे काम हाती घेतले असून, गटार बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या भागात पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत होते. परिणामी वाहन चालवताना अडथळे निर्माण होत होते, तर पादचाऱ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या समस्येमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी होती.
नागरिकांच्या या समस्येची दखल घेत खा. स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांनंतर अखेर संबंधित विभागाने प्रत्यक्ष काम सुरू केले आहे.
अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीपासून शासकीय तंत्रनिकेतन परिसरापर्यंत गटार उभारणीचे काम करण्यात येत आहे. या माध्यमातून पावसाचे पाणी रस्त्यावर थांबण्याऐवजी नियोजित मार्गाने वाहून जाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून, नागरिकांची गैरसोयही कमी होणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी महापौर दीपमाला काळे यांनी घटनास्थळी भेट देत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी राहुल पाटील, आशिष कासट तसेच कंत्राटदार कृष्णा मुरारी मिश्रा उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी कामाची सद्यस्थिती आणि पुढील नियोजनाबाबत महापौरांना माहिती दिली.
पाहणीवेळी महापौरांनी कामाच्या गुणवत्तेबाबत विशेष सूचना दिल्या. पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन काम जलद गतीने पूर्ण करावे, तसेच बांधकाम करताना दर्जामध्ये कोणतीही तडजोड होऊ नये, असे निर्देश त्यांनी दिले.
महामार्गावरील पाणी साचण्याची समस्या दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या कामामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली असून, पावसाळ्यातील वाहतुकीची कोंडी आणि गैरसोय कमी होण्याची शक्यता आहे.
