परंपरा आणि भक्तीचा संगम; ‘जय मुक्ताई माऊली’च्या जयघोषात वारीचा पंढरपूरकडे प्रवास सुरू
साईमत /मुक्ताईनगर /प्रतिनिधी
आषाढी वारीच्या भक्तिमय प्रवासात संत मुक्ताई पालखी सोहळ्याने धाराशिव जिल्ह्यातील भूम नगरीत प्रवेश करताच एक वेगळे आणि आकर्षक दृश्य अनुभवायला मिळाले. संत मुक्ताई माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेंढ्यांच्या गोल रिंगणाने उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेतले. वारकरी परंपरेतील या अनोख्या सोहळ्याने भूम येथील वातावरण भक्तिरसाने भारावून गेले.
संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळ्याचा प्रवास आता अंतिम टप्प्याकडे जात असून, शुक्रवारी या वारीचा २४ वा दिवस होता. दुपारच्या वेळी पालखीचे भूम येथे आगमन झाले. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेतले. भूम येथे विसावा घेतल्यानंतर रात्री पालखीचा मुक्कामही याच ठिकाणी झाला. येत्या २७ जुलै रोजी संत मुक्ताईंची पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
पालखी सोहळ्याच्या मार्गावर प्रत्येक ठिकाणी भक्तीचा उत्साह पाहायला मिळत आहे. भूम येथे पालखी दाखल होताच ‘जय मुक्ताई माऊली’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाच्या गजराने आणि अभंगांच्या स्वरांनी संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते. ग्रामस्थांनी फुलांची उधळण करत तसेच महाप्रसादाचे आयोजन करून पालखीचे मोठ्या श्रद्धेने स्वागत केले.
यंदाच्या वारीमध्ये वारकऱ्यांचा उत्साह विशेष जाणवत असून, संत मुक्ताईंच्या नामस्मरणात हजारो वारकरी नियमितपणे सहभागी होत आहेत. मार्गातील गावांमधील नागरिकही सेवाभावाने वारकऱ्यांची व्यवस्था करत असून, पाणी, भोजन आणि निवासाची सोय करून वारीतील सहभागाची परंपरा जपत आहेत.
संत मुक्ताई पालखी सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अभिमान आहे. भक्ती, शिस्त आणि सेवाभाव यांचा सुंदर मिलाफ या वारीत दिसून येत असल्याचे संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे यांनी सांगितले.
या पालखी सोहळ्यासाठी मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, विशाल महाराज खोले, सम्राट पाटील, ज्ञानेश्वर हरणे, पंकज महाराज, नितीन महाराज, विजय खवले आणि योगेश महाराज यांच्यासह अनेक मान्यवर व सेवेकरी सहभागी झाले आहेत. त्यांच्या नियोजनामुळे आणि सेवाभावामुळे संत मुक्ताईंची वारी भक्तिभावाने पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.
