चोरांच्या हालचालींवर पोलिसांची नजर, ४ लाख ३० हजारांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत ,तीन आरोपी अटकेत, चोरीच्या ११ दुचाकी जप्त
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
शहरातील दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हापेठ पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी वेगवान तपास, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि तांत्रिक माहितीच्या आधारे दुचाकी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ११ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत सुमारे ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
शहरातील विविध भागांमधून मोटारसायकली चोरीला जाण्याच्या घटना वाढत असल्याने पोलीस प्रशासनाने या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेतली होती. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना ताब्यात घेण्याचे निर्देश दिले होते.
या सूचनेनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांनी विशेष पथक तयार करून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला. पथकाने चोरीच्या घटनास्थळांवरील सीसीटीव्ही चित्रण तपासले तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जियाउलहक अब्दुलहक शेख (वय ३४, रा. आझादनगर, अडावद, ता. चोपडा) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीमध्ये त्याने जळगाव शहरासह अन्य ठिकाणी मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत सुमारे २ लाख २० हजार रुपये आहे.
या चोरीच्या दुचाकी जळगाव जिल्ह्यातील जिल्हापेठ, पारोळा, शिरपूर, चोपडा, यावल तसेच मध्य प्रदेशातील काही भागांतून चोरी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. संबंधित पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे उमेश प्रदीप पाटील (वय २२, रा. पिंगळवाडी, ता. अमळनेर, ह.मु. रायपूर एमआयडीसी, जळगाव) याला अटक केली. चौकशीत त्याने दुचाकी चोरीच्या आणखी घटनांची माहिती दिली. त्याच्याकडून एमआयडीसी आणि फुले मार्केट परिसरातील चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत १ लाख ७५ हजार रुपये आहे.
दरम्यान, १७ जुलै रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना कैलास वसंतदास मथुरे (वय २८, रा. जुनोने, ता. जामनेर) हा हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकलसह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. चौकशीदरम्यान त्याने समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तपासात सदर मोटारसायकल सोयगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे समोर आले. त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली.
एकूण तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तीन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून ११ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे.
नागरिकांनीही आपल्या वाहनांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, वाहन पार्क करताना सुरक्षित जागेची निवड करावी, वाहनांना योग्य प्रकारे लॉक करावे तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हापेठ पोलीस पथकाने केली.
या पथकात सफौ संजय दोरकर तसेच पोलीस हवालदार महेश महाजन, महेंद्र पाटील, किरण वानखेडे, जितेंद्र सुरवाडे, राजेश पदमर, संतोष सोनवणे, तेजस मराठे, अमित मराठे, प्रशांत सैंदाणे, प्रवीण जाधव, अजय सपकाळे, कमलाकर बडगुजर, नरेंद्र दिवेकर, संजय लाटे आणि अजय आहिरे यांचा समावेश होता.
