खडकदेवळाला इफ्तार पार्टीतून जातीय सलोख्याचे घडले दर्शन

0
1

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

येथून जवळील खडकदेवळा येथे रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांसाठी डॉ.वाय.पी. युवा फाउंडेशन आणि साईनाथ सार्वजनिक वाचनालय, ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने खडकदेवळा खु. येथील मशिदमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. इफ्तार पार्टीतून जातीय सलोख्याचे दर्शन घडून आले. अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख, बाबू मामू खाटीक, अनिस मामु खाटीक, आरिफ शेख, शकील खाटीक होते. प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना हाफिज जाकीर, इस्माईल शेख, खडकदेवळा खु.चे सरपंच सुदाम वाघ, उपसरपंच नामदेव दाभाडे, पोलीस पाटील तुकाराम तेली, खडकदेवळा बु.चे सरपंच अनिल देवरे, पोलीस पाटील एकनाथ कोळी, युवा नेते बापू पाटील, डॉ. राजू तेली, युनूस तडवी, वाचनालयाचे विश्‍वास पाटील, संजय निकम, देवचंद गायकवाड, संजय देवरे गुरुजी, बापूजी देवरे आदी उपस्थित होते.

यावेळी फाउंडेशनचे डॉ. यशवंत पाटील यांनी रमजान ईद उल-फित्र पवित्र महिन्याविषयी माहिती दिली. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव दररोज पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. जातीभेदांच्या भिंती नष्ट करून हिंदू-मुस्लिमांतील सामाजिक सलोखा जपणे, भाईचारा, अमन, शांती, आपण सर्व एक आहोत हीच विचारसरणी रमजान शिकवत असतो, असे ते शेवटी म्हणाले.

यावेळी इफ्तार पार्टीमध्ये फाउंडेशन आणि वाचनालयाचे पदाधिकाऱ्यांसह प्रमुख मान्यवरांचे सर्व मुस्लिम बांधवांनी टोपी घालून, पुष्पगुच्छ व सुकामेवा व फळे एकमेकांना भरवून प्रेम व्यक्त करून स्वागत केले. तसेच लहान मुलांना चॉकलेट व बिस्किटचे वाटप करण्यात आले. यशस्वीतेसाठी वाचनालय, फाउंडेशनचे पदाधिकारी, खडकदेवळा ग्रामस्थ, मुस्लिम बिरादरी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन देवचंद गायकवाड तर आभार विश्‍वास पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here