देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरट्यांचा डल्ला
साईमत/भुसावळ / प्रतिनिधी
शहरातील जामनेर रोडवरील विकास कॉलनी परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद भास्कर भंगाळे (वय ५८, रा. विकास कॉलनी, जामनेर रोड, भुसावळ) हे आपल्या पत्नीसह पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. ११ जून रोजी रात्री त्यांनी घराला कुलूप लावून प्रवास सुरू केला होता.
दरम्यान, १५ जून रोजी सायंकाळी ते घरी परतल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. घरात प्रवेश केल्यानंतर हॉलमधील ड्रॉवर अस्ताव्यस्त स्थितीत दिसून आले, तसेच बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
चोरट्यांनी कपाटातील लॉकर उघडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मौल्यवान ऐवज चोरून नेला. यात चार सोन्याच्या अंगठ्या, एक सोन्याचे नाणे, आणखी एक अंगठी, चांदीचे कडे तसेच रोख रक्कमेचा समावेश आहे.
संपूर्ण चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख ७१ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रमोद भंगाळे यांच्या तक्रारीवरून १६ जून रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींचा शोध सुरू आहे.
