मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदिल मिळाल्याने चोपड्यात बुधवारी हिंदू राष्ट्रजागृती सभा

0
4

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

येथे बुधवारी, २१ फेब्रुवारी २०२४ यादिवशी सकल हिंदू समाजाच्यावतीने होणाऱ्या हिंदू राष्ट्रजागृती सभेसाठीची अनुमती पोलिसांनी नाकारली होती. ‘तेलंगणाचे भाजपाचे आमदार तथा प्रखर हिंदुत्ववादी श्री. टी. राजासिंह हे प्रक्षोभक आणि द्वेषमूलक वक्तव्य करतात’, हे कारण देत पोलिसांनी अनुमती नाकारली होती. सभेची अनुमती घेण्यासाठी सकल हिंदू समाजाने २५ जानेवारी यादिवशी म्हणजे सभेच्या २५ दिवस आधीच पोलिसांकडे निवेदन दिले होते. परंतु पोलिसांनी सभेच्या दोन दिवसाआधी तीन सार्वजनिक सुट्ट्या बघून अनुमती नाकारली. याविषयी समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्यावतीने अनिल वानखेडे आणि राजाराम पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात फौजदारी ‘रिट याचिका’ प्रविष्ट केली होती. मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदिल मिळाल्याने चोपड्यात बुधवारी हिंदू राष्ट्रजागृती सभा होणार आहे.

उच्च न्यायालयाने तातडीने २० फेब्रुवारी रोजी सुनावणी घेऊन हिंदू राष्ट्रजागृती सभा घेण्यास अनुमती दिली आहे. याविषयी न्यायालयाने चोपडा पोलिसांना तसा लेखी आदेशही दिला आहे. याचिकेवर समितीच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता कुलकर्णी आणि अधिवक्ता उमेश भडगावकर यांनी युक्तीवाद केला.

न्या.मंगेश पाटील आणि शैलेश ब्रह्मे यांच्या खंडपीठाने अधिवक्त्यांचा युक्तीवाद लक्षात घेऊन २१ फेब्रुवारी या दिवशी होणाऱ्या सभेला अनुमती नाकारणारा आदेश रद्दबातल ठरविला. ‘सभेस अनुमती द्या’, असा लिखित आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिला. ‘पोलीस अधिकारी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी काही अटी घालू शकतात’, असेही न्यायालयाने नमूद केले असल्याची माहिती याचिकाकर्ते अनिल वानखेडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here