एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; १० हजारांचे अग्नीशस्त्र जप्त, तांबापुऱ्यातील २५ वर्षीय तरुण अटकेत
साईमत- जळगाव – प्रतिनिधी|
शहरातील मेहरूण तलाव परिसरात गावठी कट्टा (अग्नीशस्त्र) बाळगून दहशत माजवणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा मॅगझिनसह लोखंडी काळ्या रंगाचा गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला असून, या कारवाईमुळे जळगावातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.
.
पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना २४ जून २०२६ रोजी त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. मेहरूण तलाव परिसरात एक इसम बेकायदेशीरपणे गावठी कट्टा बाळगून फिरत असून तो परिसरात दहशत निर्माण करत असल्याचे समोर आले. धनके यांनी तात्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांना दिली. माहितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षकांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
मिळालेल्या आदेशानुसार, उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सफौ. विजयसिंग पाटील, पोकॉ. गणेश ठाकरे, किरण पाटील, नितीन ठाकूर, रमाकांत साळुंखे आणि सुभाष साबळे यांचे पथक तात्काळ मेहरूण तलाव परिसरात रवाना झाले. मेहरूण ट्रॅक परिसरातील ‘सुबोनिया पक्षी घरा’च्या बाजूला एक तरुण संशयास्पद रितीने फिरताना पोलिसांना दिसला.
पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता, त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोकॉ. गणेश ठाकरे आणि पोकॉ. रमाकांत साळुंखे यांनी जीवाची पर्वा न करता त्याचा थरारक पाठलाग केला आणि त्याला जागीच दबोचले.
आरोपीचे नाव: समीर खान जावेद खान (वय २५ वर्षे, व्यवसाय- मजुरी).
राहणार: बिलाल चौक, तांबापुरा, जळगाव.
आरोपीची झडती घेतली असता, त्याच्याकडे १०,०००/- रुपये किमतीचा एक लोखंडी काळ्या रंगाचा गावठी कट्टा (अग्नीशस्त्र) मिळून आला. या पिस्तूल ग्रिपच्या दोन्ही बाजूस काळ्या रंगाची प्लास्टिकची ग्रिप असून त्यावर काळ्या रंगाचा चिकटपट्टी गुंडाळलेली आहे.
पोलिसांनी दोन पंचांसमक्ष सदर गावठी कट्टा जप्त केला असून, आरोपी समीर खान विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७३/२०२६ अन्वये कलम ३/२५ भारतीय शस्त्र अधिनियम (Arms Act) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सफौ. विजयसिंग पाटील करत आहेत.
ही धडक कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक मा. श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. संदिप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी (जळगाव भाग) मा. श्री. नितीन गणापुरे आणि एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने फत्ते केली.
