साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
एखाद्या मुलाच्या हातात मातीचा छोटासा गोळा असतो, पण त्या गोळ्यात दडलेले असते उद्याचे हिरवेगार जंगल! हाच अनोखा संदेश देत अनुभूती बालनिकेतन मॉन्टेसरी व अनुभूती विद्या निकेतन येथे दि. १३ ते १८ जुलै दरम्यान “अनुभूती ट्री फेस्टिव्हल” अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक पद्धतीने हजारो सीड बॉल (बीजगोळे) तयार करत पर्यावरण संवर्धनाचा एक अनोखा आणि प्रभावी संदेश दिला आहे.
जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन व अंबिका जैन यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून व संकल्पनेतून हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. प्राचार्य मनोज परमार यांच्यासह सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड दिली.
विद्यार्थ्यांनी घेतले ‘वैज्ञानिक’ प्रशिक्षण
जैन इरिगेशनच्या गार्डन विभागाचे अजय काळे, गिरीष जगताप, पर्यावरण विभागाचे राजेंद्र राणे, मयूर देशमूख आणि विद्यालयातील ताई-दादांनी विद्यार्थ्यांना सीड बॉल तयार करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले. माती, सेंद्रिय खत आणि स्थानिक (देशी) वृक्षांच्या बियांचा वापर करून वैज्ञानिक पद्धतीने बीजगोळे कसे बनवावे, हे मुलांनी प्रत्यक्ष कृतीतून शिकून घेतले. हे सीड बॉल आगामी पावसाळ्यात डोंगराळ, दुर्गम आणि ओसाड भागात टाकण्यात येणार आहेत, जेणेकरून नैसर्गिकरीत्या हरितक्षेत्र वाढून जैवविविधतेचे संवर्धन होईल.
विद्यार्थी बनणार ‘ग्रीन अम्बेसेडर’ : संचालिका अंबिका जैन
महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात विद्यालयाच्या संचालिका अंबिका जैन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सीड बॉलचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “‘हॅण्ड, हार्ट आणि हेड’ याद्वारे निर्माण झालेले हे सीड बॉल म्हणजे मुलांचे निसर्गाशी नाते जोडणारी सुंदर कृती आहे. विद्यार्थ्यांनी आता ‘ग्रीन अम्बेसेडर’ (हरित दूत) बनून अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत, त्यांचे संगोपन केले पाहिजे आणि पर्यावरण संरक्षणाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनविले पाहिजे.”
लहान वयातच रुजली पर्यावरण रक्षणाची जाणीव
खेळता-खेळता मुलांनी बीजसंवर्धन आणि जैवविविधतेचे महत्त्व आत्मसात केले. वर्गखोल्यांच्या बाहेर घडलेला हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभराची शिदोरी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. याविषयी बोलताना प्राचार्य मनोज परमार म्हणाले की, “पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, ही जाणीव या उपक्रमाच्या माध्यमातून अत्यंत लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनात यशस्वीपणे रुजली आहे.”
’झाडे लावू, झाडे जगवू…’ सामूहिक प्रतिज्ञा!
कार्यक्रमाच्या सांगतेवेळी सर्व विद्यार्थ्यांनी हातात सीड बॉल घेत “झाडे लावू, झाडे जगवू आणि पर्यावरण वाचवू” अशी सामूहिक आणि उत्स्फूर्त प्रतिज्ञा केली. या निरागस हातांनी तयार केलेले हे बीजगोळे उद्या हजारो विशाल वृक्षांचे रूप धारण करतील आणि निसर्गाला समृद्ध करतील, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.
