साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) जळगावतर्फे आयोजित करण्यात आलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचा सोहळा आज अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. आज भगवान जगन्नाथ महाराजांचे भव्य दर्शन आणि महाआरतीचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या भव्य आरती आणि रॅलीची (रथयात्रा) सुरुवात राजू मामा भोळे आणि डॉ. अमित भंगाळे यांच्या हस्ते करण्यात आली. राजू मामा भोळे यांच्या हस्ते भगवान जगन्नाथ महाराजांची विधीवत महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर रथयात्रेला हिरवा कंदील दाखवून सुरुवात झाली.
परदेशी भक्तांचा सहभाग आणि हरिनामाचा गजर
यंदाच्या रथयात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये स्थानिक भाविकांसह इस्कॉनचे परदेशी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेषतः हंगेरी (Hungary) देशातून आलेल्या इस्कॉन भक्ताने या रॅलीमध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, जो जळगावकरांसाठी मुख्य आकर्षण ठरला. याशिवाय रशिया आणि युक्रेन येथील भक्तांनीही मृदंग-करतालाच्या तालावर एकत्रितपणे ‘हरे कृष्णा’ महामंत्राचे हरिनाम संकीर्तन आणि भक्तीमय नृत्य सादर करत संपूर्ण जळगाव शहर भक्तिरसात न्हाऊन काढले.
जिल्हा क्रीडा संकुलाजवळील पोलीस पादालय हॉल येथून निघालेली ही भव्य रथयात्रा नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गक्रमण करत मार्गस्थ झाली. डिजिटल आणि मेकॅनिकल तंत्रज्ञानाने सज्ज असलेला ७ टन वजनाचा हायटेक रथ पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. शहरातील विद्युत तारा व झाडांच्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी या रथाला ‘मोटराईज्ड कॅनोपी लिफ्टिंग सिस्टीम’ बसवण्यात आली होती.
५६ भोग आणि महाप्रसादाचे वाटप
संध्याकाळी भगवान जगन्नाथांना ५६ भोग अर्पण करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाआरती संपन्न झाली. या सोहळ्याच्या सांगतेनिमित्त तब्बल ३ हजार भक्तांसाठी विशेष महाप्रसाद तयार करण्यात आला होता. यामध्ये २०० किलो भात, ९० किलो डाळीचा प्रसाद, ८० किलो गोड बुंदी आणि २० किलो कुरकुरीत पापड अशा भव्य महाप्रसादाचे वाटप सर्व भाविकांना करण्यात आले.
हा मंगलमय सोहळा यशस्वी करण्यासाठी इस्कॉन जळगावच्या स्वयंसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
