डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेत जीवनयात्रा संपवली
साईमत /जामनेर /प्रतिनिधी
वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडविण्याचे स्वप्न उराशी बाळगून नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका होतकरू विद्यार्थ्याचा अखेर दुर्दैवी अंत झाला. नीट परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून जामनेर तालुक्यातील नागनचौकी येथील २० वर्षीय समर्थ ज्ञानेश्वर पाटील याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
समर्थ पाटील हा अभ्यासू आणि मेहनती विद्यार्थी म्हणून परिचित होता. डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो नीट परीक्षेची तयारी करत होता. पहिल्या प्रयत्नात अपेक्षित गुण मिळाले नसतानाही त्याने खचून न जाता पुन्हा वर्षभर जोमाने अभ्यास केला. मात्र, दुसऱ्या प्रयत्नातही अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने तो मानसिक तणावात गेला असल्याचे सांगितले जात आहे.
शुक्रवारी दुपारी घरातील सदस्य आपापल्या कामात व्यस्त असताना ही दुर्दैवी घटना घडली. समर्थचे वडील कामानिमित्त जामनेर येथे गेले होते, आई घरी होती, तर बहीण शाळेत गेली होती. याच दरम्यान समर्थने नागनचौकी परिसरातील शेताजवळील शेडमध्ये गळफास घेत जीवन संपवले. काही वेळाने ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांसह ग्रामस्थांना मोठा धक्का बसला.
समर्थच्या अचानक जाण्याने गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. कुटुंबीयांकडून त्याच्यावर कोणताही दबाव नव्हता, मात्र स्पर्धात्मक परीक्षांमध्ये वारंवार येणारे अपयश आणि त्यातून निर्माण झालेला मानसिक ताण यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
दरम्यान, या घटनेने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. करिअरच्या स्पर्धेत अपयश आले तरी जीवन संपविणे हा पर्याय नसून, अशा काळात विद्यार्थ्यांनी पालक, शिक्षक आणि मित्रांशी संवाद साधणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे. नागनचौकीसह जामनेर तालुक्यात या घटनेबाबत तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
