साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील गलवाडे रोड प्रताप मिल नगरमधील अनियमित पाणी पुरवठा विरोधात न.पा.च्या मुख्याधिकाऱ्यांच्या बंगल्यावर महिलांनी हंडा मोर्चा काढून नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते योगिराज संदनाशिव, दीपक चौघुले, महेश कासार, भैया नाईक, गोपाल सर, संजू चौधरी, मुस्ताक शेख, चंद्रकांत देवकते, रवि सोनवणे, प्रभाकर साबळे, नासिर मुजावर, राहुल पोकळे, गंगू आजी, पद्मा देवकते, सिंधु मराठे, जया साबळे, संगीता चौगुले यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
शहरातील झामी चौकातील पाण्याची टाकी गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून जीर्ण झाल्याने पाडून पाइप लाइन वळविण्याचे काम सुरू होते. दरम्यान वळविलेली पाइप लाइन पुन्हा फुटल्याने दुरुस्ती कामी पाणी पुरवठा थांबविण्यात आला. त्यामुळे शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने खासगी पाणी पुरवठा करणाऱ्या व्यक्तींनी नागरिकांना अवाच्या सव्वा दरात पाणी पुरवठा करून लूट सुरू केली. पंधरा दिवस उलटूनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते योगिराज संदनाशिव आणि दीपक चौघुले यांनी या गंभीर बाबींकडे न.पा.प्रशासनाचे लक्ष वेधले जावे, हा गंभीर प्रश्न त्वरित सोडवावा, म्हणून न.पा.मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या निवासस्थानी महिलांनी हंडा मोर्चा काढला. त्यानंतर नागरिकांच्या समस्या त्यांच्या कानावर टाकल्या. नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी न.पा.च्या मुख्याधिकाऱ्यांंना गळ घातली.