शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणादायी उजळणी
साईमत/जळगाव / प्रतिनिधी
समाजात समता, न्याय आणि प्रगतीचा विचार रुजवणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त जळगावात “समता दिन” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अर्पण सेवा ट्रस्ट आणि पवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बहिणाबाई प्राथमिक माध्यमिक विद्यालयात आयोजित “कृतज्ञता पर्व” कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या कार्याची आणि विचारांची आठवण करत समाजातील सर्व घटकांपर्यंत समतेचा संदेश पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.
अर्पण सेवा ट्रस्टचे सचिव रघुनाथ राणे यांनी सांगितले की, शाहू महाराजांच्या कार्याचा प्रसार करण्यासाठी वर्षभर विविध सांस्कृतिक उपक्रम, पोवाडे आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. विलास नारखेडे यांनी शाहू महाराजांच्या बहुआयामी कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी शिक्षण, शेती, जलव्यवस्थापन, कला, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रात केलेल्या सुधारणा समाज परिवर्तनाचे भक्कम आधार ठरल्या. वंचित घटकांना संधी देत त्यांनी सामाजिक समतेचा पाया मजबूत केला, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला संतोष सोनार, महेंद्र पाटील, जगदीश कुमार, लोकेश राणे, पवन नारखेडे, लीलाधर नारखेडे, मीना निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमातून समतेचा विचार दृढ करत सामाजिक बांधिलकीची जाणीव अधोरेखित करण्यात आली.
