साईमत न्यूज नेटवर्क –
अंबाला (हरियाणा) : किरकोळ आर्थिक वादातून एका तरुणाने स्वतःच्या कुटुंबीयांवर गोळीबार करत तिहेरी हत्याकांड घडवल्याची धक्कादायक घटना हरियाणातील अंबाला येथे उघडकीस आली आहे. या घटनेत आरोपीने स्वतःची आजी, काका आणि मोठ्या भावाची निर्घृण हत्या केली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आरोपी घटनेनंतर फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक पोटा असे आरोपीचे नाव आहे. घराशेजारी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो निळी टोपी आणि पांढरा शर्ट परिधान करून हातात रिव्हॉल्वर घेऊन घराकडे जाताना दिसतो. सुरुवातीला घरात कोणी नसल्याचे पाहून तो बाहेर येतो. त्याच वेळी त्याची वृद्ध आजी समोर येताच अभिषेकने क्षणाचाही विलंब न करता तिच्यावर गोळी झाडली. गोळी लागल्यानंतर त्या जागीच कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.
यानंतर आरोपीने इतर कुटुंबीयांचा शोध घेत पुन्हा गोळीबार सुरू केला. गोळीबाराचा आवाज ऐकून घरातील सदस्य घाबरून बाहेर धावले. त्यावेळी काकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्यांच्यावरही गोळी झाडली. गोळी छातीत लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर मोठ्या भावावरही गोळीबार करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
या अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत आजीचा मृतदेह ताब्यात घेत पुढील तपासासाठी पाठवला.
दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या काका, काकू आणि मोठा भाऊ संदीप यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंदीगड येथील पीजीआय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान काका आणि मोठ्या भावाचा मृत्यू झाला. काकूंची प्रकृती अद्याप गंभीर असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिचपडी गावातील जमिनीतून माती काढण्याच्या कंत्राटातील पैशांच्या वाटणीवरून कुटुंबात काही दिवसांपासून वाद सुरू होता. शनिवारी सायंकाळी पुन्हा झालेल्या जोरदार वादानंतर संतापलेल्या अभिषेकने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
