८ राज्यांतील २०० हून अधिक शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग; १६३ कृषी बिझनेस प्लॅनचे सादरीकरण
जळगाव प्रतिनिधी |
भविष्यातील कृषी क्षेत्राला नवे तंत्रज्ञान आणि सक्षम नेतृत्व देण्यासाठी सुरू असलेल्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (फाली) या राष्ट्रीय स्तरावरील महा-अधिवेशनाचा ८ जून रोजी जैन हिल्स येथे उत्साहात समारोप झाला. १ ते ८ जून दरम्यान तीन वेगवेगळ्या टप्प्यांत पार पडलेल्या या अधिवेशनात देशभरातील विद्यार्थ्यांनी १६३ कृषी इन्व्होशन आणि १६३ कृषी बिझनेस प्लॅन्स सादर करून आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली.
यातील अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या तिसऱ्या सत्रात कृषी बिझनेस प्लॅनमध्ये जळगावच्या ‘अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल’ने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला, तर कृषी इन्व्होशन प्रकारात कोल्हापूरच्या सीताबाई पटवर्धन हायस्कूलने राज्यात पहिला क्रमांक मिळवला.
जळगावच्या ‘अनुभूती स्कूल’चा दुहेरी डंका!
या अधिवेशनात जळगावच्या अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाळेला दोन मोठी पारितोषिके मिळाली:
१. कृषी बिझनेस प्लॅन: ‘कार्बोक्रेड कार्बन क्रेडिट अँड सस्टेनेबल ॲग्रीकल्चर प्लॅटफॉर्म’ या संकल्पनेला प्रथम पारितोषिक मिळाले.
२. कृषी इन्व्होशन: विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘नेक्सो बायोपल्ग’ या प्रकल्पाला तिसरे पारितोषिक मिळाले.
मोठ्याभाऊंचा ‘तो’ यशोमंत्र आजही मार्गदर्शक: अभिजित जोशी
समारोप प्रसंगी बोलताना जैन इरिगेशनचे अभिजित जोशी यांनी जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “मी कंपनीत रुजू झालो तेव्हा मोठेभाऊंनी मला लायब्ररीत पुस्तके लावण्याचे काम दिले होते. त्यावेळी त्यांनी यशाचे रहस्य सांगताना मला एक जीवनमंत्र दिला होता की— ‘मी चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं कधीच हातातून जाऊ देत नाही’, हाच मंत्र आजच्या युवा पिढीलाही यशाच्या शिखरावर नेणारा आहे.”
यावेळी फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी यांनी संस्थेच्या प्रवासाचा आढावा घेतला, तसेच फालीच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) शार्बोनी पोद्दार यांची सर्वांशी ओळख करून दिली.
निकाल एका दृष्टीक्षेपात:
१) कृषी इन्व्होशन (नाविन्यपूर्ण शोध) सादरीकरण:
प्रथम: सीताबाई पटवर्धन हायस्कूल (कुरुंदवाड, कोल्हापूर)
द्वितीय: सरस्वती साधना विद्या मंदिर, शांतीवन (आर्वी, बीड)
तृतीय: अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल (जळगाव)
चतुर्थ: महाराजा सयाजीराव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (सातारा)
पाचवा: अण्णासाहेब कल्याणी विद्यालय (सातारा)
२) कृषी बिझनेस प्लॅन (कृषी व्यवसाय संकल्पना):
प्रथम: अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल (जळगाव)
द्वितीय: सीताबाई पटवर्धन हायस्कूल (कुरुंदवाड, कोल्हापूर)
तृतीय: एम. जी. शहा विद्यामंदिर (बाहुबली, कोल्हापूर)
चतुर्थ: दानोळी हायस्कूल (दानोळी, कोल्हापूर)
पाचवा: महाराजा सयाजीराव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय (सातारा)
दिग्गज कॉर्पोरेट कंपन्यांचे सहकार्य
८ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या उपक्रमात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील २०० पेक्षा जास्त शाळा सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमाला जैन इरिगेशनसह गोदरेज ॲग्रोवेट, युपीएल, स्टार ॲग्री, रॅलीज इंडिया, ओमनिवोअर, प्रॉम्पट, एसबीआय फाउंडेशन, अमूल, उज्जीवन, रयत शिक्षण संस्था आणि गांधी रिसर्च फाउंडेशन या नामांकित कंपन्यांचे मोठे सहकार्य लाभले. कार्यक्रमात विनोद चौधरी, अंकित लढ्ढा, शुभेंदू दास, दुर्गेश गोयल यांच्यासह विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आपले अनुभव मांडले. आभार व सूत्रसंचालन फालीच्या व्यवस्थापनाने केले.
