साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
एमआयडीसीतील कंपनीतून नेहमीप्रमाणे कामावरून घराकडे परतणाऱ्या एका ४८ वर्षीय प्रौढाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा भीषण अपघात जळगाव शहरातील अत्यंत गजबजलेल्या आरएल चौफुलीवर सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला. या घटनेमुळे अयोध्या नगर परिसरात शोककळा पसरली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
संदीप सुपडू अलकरी (वय ४८, रा. अयोध्या नगर, जळगाव) असे अपघातात प्राण गमावलेल्या कामगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप अलकरी हे एमआयडीसी क्षेत्रातील एका खाजगी कंपनीत कामाला होते. सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कंपनीतील काम आटोपून ते आपल्या दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले होते. आरएल चौफुली जवळ आले असता, एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, अलकरी हे रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अलकरी यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
संदीप अलकरी यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच अयोध्या नगर परिसरातील नागरिक व त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा असा अचानक दुर्दैवी अंत झाल्याने अलकरी कुटुंबीरयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अज्ञात वाहनधारकाचा शोध सुरू
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू आहे. धडक देऊन फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा व चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीसीटीव्ही फुटेज तपासत असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
