६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; कार, दुचाकी आणि ५ मोबाईल जप्त
साईमत -जळगाव / चोपडा- प्रतिनिधी |
अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांविरोधात जळगाव पोलिसांनी उघडलेल्या धडक मोहिमेअंतर्गत चोपडा ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लासूर ते हातेड मार्गावर सापळा रचून तब्बल ७ किलो ११६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी तीन आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
गोपनीय बातमीदाराच्या माहितीवर मध्यरात्री धाड
२६ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास लासूर ते हातेड मार्गावरील पाटचारीजवळ हातेड शिवारात गांजाची वाहतूक होणार असल्याची अचूक माहिती गोपनीय सूत्रांकडून चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली. संशयित वाहन येताच त्याला रोखून तपासणी केली असता, कारमध्ये लपवून ठेवलेला ७ किलो ११६ ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाहनातील तिघांना ताब्यात घेतले.
पुणे आणि अहिल्यानगरचे आरोपी गजाआड
या प्रकरणी पोलिसांनी विष्णू सुभाष सुळे (रा. पिंप्री, जि. पुणे), प्रकाश बबन शिंदे आणि प्रशांत ताराचंद अथाणी (दोघे रा. टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली आहे. आरोपी हे अमली पदार्थांची साखळी कुठपर्यंत पसरली आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत: ₹६,०८,९००)
गांजा: ₹१,७७,००० (७ किलो ११६ ग्रॅम)
वाहने: ₹३,००,००० (हुंडाई सॅन्ट्रो कार) आणि ₹९०,००० (पल्सर मोटारसायकल)
इतर: ₹४१,००० (५ मोबाईल फोन)
चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अमली पदार्थांची तस्करीत गुंतलेल्या इतर घटकांवरही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
