ममुराबादच्या भिल्ल वस्तीतील १०८ कुटुंबांना जीवनावश्यक किराणा किटचे वाटप
साईमत /पाळधी (ता. धरणगाव)/ प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे मुसळधार पावसामुळे लेंडी नाल्याला आलेल्या पुराचा फटका नाल्यालगतच्या भिल्ल वस्तीला मोठ्या प्रमाणावर बसला. पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने अनेक कुटुंबांचे अन्नधान्य, घरगुती साहित्य आणि दैनंदिन वापराच्या जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले. या आपत्तीमुळे अत्यंत गरीब व गरजू कुटुंबांवर संकट कोसळले असताना जीपीएस ग्रुपने तातडीने मदतीचा हात पुढे करत १०८ पूरग्रस्त नागरिकांना किराणा किटचे वाटप करून दिलासा दिला.
गावातील सरपंच व ग्रामस्थांनी पूरस्थितीची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच युवा नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांना दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली जीपीएस ग्रुपने तातडीने मदतकार्य सुरू केले. पूरग्रस्तांसाठी तयार करण्यात आलेल्या किराणा किटचे वितरण प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
मदत साहित्याचे वितरण करण्यापूर्वी प्रतापराव पाटील यांनी भिल्ल वस्तीतील पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी घरांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. पुरामुळे बाधित झालेली घरे, रस्ते आणि परिसराची पाहणी करून नागरिकांना धीर देत आवश्यक त्या मदतीचे आश्वासन दिले. या भेटीदरम्यान मदतीचा हात पुढे आल्याने अनेक पूरग्रस्त कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान आणि दिलासाचे भाव पाहायला मिळाले.
यावेळी प्रतापराव पाटील यांनी संकटाच्या काळात गरजूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हीच खरी समाजसेवा असल्याचे सांगितले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जीपीएस ग्रुपने केवळ मदत साहित्याचे वितरण केले नसून, संकटग्रस्त कुटुंबांना आपण एकटे नाही, हा विश्वासही दिला आहे. समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने अशा आपत्तीच्या काळात पुढाकार घेऊन गरजूंना मदतीचा हात द्यावा, हीच खरी माणुसकी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी ममुराबादचे उपसरपंच विलास सोनवणे, युवा सेनेचे किरण पाटील, राहुल ढाके, किरण पुंडलिक पाटील, गोपाल मोरे, लक्ष्मीबाई भिल्ल, वासुदेव ढाके, चंदू नाना पाटील, सुनीलभाऊ वाघोडे, प्रमोदभाऊ शिंदे, मुकुंद मुंदडा, तुरखेडाचे सरपंच नितीन सपकाळे, पत्रकार सचिनभाऊ पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी गावाच्या वतीने तसेच मदत साहित्याचा लाभ घेतलेल्या पूरग्रस्त कुटुंबांच्या वतीने युवा सेनेचे किरण पाटील यांनी जीपीएस ग्रुप, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि प्रतापराव पाटील यांचे आभार मानले. या मदतीमुळे संकटग्रस्त कुटुंबांना मोठा मानसिक व आर्थिक आधार मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मदतीच्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी आणि आपत्तीच्या काळात एकजुटीने उभे राहण्याचा संदेशही अधोरेखित झाला.
