जैन फार्मफ्रेश, नेस्ले आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनचा संयुक्त पुढाकार; शाळा परिसर व ग्रामपंचायत क्षेत्रात रोपांची लागवड
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी आणि भावी पिढीमध्ये निसर्गप्रेमाची आवड रुजवण्यासाठी धरणगाव तालुक्यातील वंजारी येथे ५०० देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. जैन फार्मफ्रेश फूड लि. आणि नेस्ले यांच्या ‘रिस्पॉन्सिबल सोर्सिंग प्रोग्राम’ (Responsible Sourcing Program) अंतर्गत गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या प्रसंगी वंजारीतील ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांचे संगोपन व संरक्षण करण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला.
वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत परिसर तसेच सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालयात स्थानिक पर्यावरणास पूरक असणाऱ्या बकुळ, कडूलिंब, आपटा, बेल, बहावा आणि करंज अशा ५०० रोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, लोकप्रतिनिधी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
शाळा परिसर हिरवागार करण्याचा आणि निसर्ग संवर्धनाचा ध्यास
“शाळा परिसर हिरवागार करणे, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करणे आणि पुढील पिढीमध्ये निसर्गाबद्दल आपुलकी रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”
– प्रशांत सूर्यवंशी, विक्रम अस्वार (गांधी रिसर्च फाउंडेशन) व योगेश महाले (कृषीसेवक, जैन फार्मफ्रेश)
लावण्यात आलेल्या सर्व ५०० रोपांची केवळ लागवड करून न थांबता, त्यांचे नियमित संगोपन व संरक्षण करण्याची जबाबदारी सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय, वंजारी ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थांनी संयुक्तपणे स्वीकारली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे काळाची गरज असल्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.
