साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
संकष्ट चतुर्थीचे औचित्य साधून जळगावातील कांचन नगर येथील जय जगदंबा मित्र मंडळात गणरायाचा पाटपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला.
जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या शुभहस्ते श्रींचे विधिवत पाटपूजन करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक वेशभूषेत तरुणाईने घेतलेला उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण कांचन नगर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे यांनी गणरायाचे दर्शन घेऊन शहरवासीयांच्या सुख-समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली.
पर्यावरण व इंधन बचतीचा संदेश
जय जगदंबा मित्र मंडळ हे दरवर्षी सामाजिक भान जपत विविध जनजागृतीपर देखावे साकारण्यासाठी ओळखले जाते. यंदाही मंडळाने पर्यावरण संवर्धनाचा वसा पुढे चालवत ‘इंधन वाचवा, देश वाचवा’ हा महत्त्वाचा संकल्प डोळ्यासमोर ठेवला आहे. या संकल्पावर आधारित आकर्षक आणि प्रबोधनात्मक देखावा यंदा साकारण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.
सोहळा यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने उपस्थित गणेशभक्तांमुळे संपूर्ण परिसरात गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच मोठा उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला.
