साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
पाणलोट क्षेत्रात सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खान्देशातील महत्त्वपूर्ण असलेल्या गिरणा मुख्य प्रकल्पाच्या जलसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजेपर्यंत धरणातील उपयुक्त पाणीसाठा ६०.९७ टक्क्यांवर पोहोचला असून, गेल्या २४ तासांत तब्बल ३४१२.८० दशलक्ष घनफूट (९६.५८२ दशलक्ष घनमीटर) नवीन पाण्याची आवक झाली आहे. या जलसंजीवनीमुळे आगामी काळातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा मोठा प्रश्न मिटणार असून नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
उपयुक्त पाणीसाठा: ६०.९७ टक्के (३१९.२३८ दशलक्ष घनमीटर)
एकूण साठा: ४०४.१३७ दशलक्ष घनमीटर
सध्याची पाण्याची पातळी: ३९३.७६८ मीटर (पूर्ण पातळी: ३९८.०७ मीटर)
धरण क्षेत्रातील पाऊस: गेल्या २४ तासांत १२ मि.मी.
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या धरणाचे सर्व रेडियल गेट्स, पीएलबीसी कालवा आणि सिंचन आउटलेट्स पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. आवक होत असलेले पाणी साठवून ठेवण्यावर प्रशासनाचा भर आहे.
मन्याड धरणातही २६ टक्के साठा
नाशिक जिल्ह्यातील मन्याड मध्यम प्रकल्पातही पाण्याची आवक सुरू असून उपयुक्त साठा २६.३६ टक्क्यांवर (१०.६१ दशलक्ष घनमीटर) पोहोचला आहे. मन्याड धरण परिसरात गेल्या २४ तासांत १५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून हंगामातील एकूण पाऊस २०५ मि.मी. झाला आहे. येथूनही सध्या कोणताही विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही.
पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता
हवामान विभागाने पुढील काही दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे गिरणा आणि मन्याड धरणांतील साठ्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
