साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगाव पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केटमधील पान मसाल्याचे दुकान फोडून मुद्देमाल लांबवणाऱ्या दोन संशयित आरोपींना जेरबंद करण्यात रामानंद नगर पोलिसांना यश आले आहे. सिद्धार्थ विनोद आढाळे (वय १९) आणि दीपक भगवान सोनवणे (वय २०, दोघे रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
७ जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी सोमानी मार्केटमधील एका पान मसाल्याच्या दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. दुकानातील विविध कंपन्यांचे ३३ हजार रुपये किमतीचे सिगारेटचे १० बॉक्स आणि रोख ५ हजार रुपये असा एकूण ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी तक्रारदार सुरेश नरवाडे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलीस अंमलदार सुधाकर अंभोरे आणि सुशील चौधरी यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली, तसेच गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला.
मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पिंप्राळा हुडको परिसरात सापळा रचून सिद्धार्थ आढाळे आणि दीपक सोनवणे या दोघांना ताब्यात घेतले.
पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता, दोघांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर २२ जुलै रोजी पोलिसांनी दोघांना अधिकृतपणे अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास रामानंद नगर पोलीस करत आहेत.
