साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जळगाव शहरातील शिवाजी नगर हमालवाडा परिसरात जुन्या घराचा स्लॅब अंगावर कोसळून गंभीर जखमी झालेल्या ६४ वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची वेदनादायी घटना घडली आहे. लक्ष्मीबाई रामचंद्र नवघरे (वय ६४, रा. शिवाजी नगर हमालवाडा, जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
झोपेत असतानाच काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीबाई नवघरे या आपल्या पतीसह शिवाजी नगर हमालवाडा भागात वास्तव्यास होत्या. २१ जुलै रोजी रात्री नेहमीप्रमाणे जेवण आटोपून त्या झोपल्या होत्या. घराचे बांधकाम अत्यंत जुने असल्याने मध्यरात्रीच्या सुमारास अचानक छताचा स्लॅब त्यांच्या अंगावर कोसळला. या दुर्घटनेत लक्ष्मीबाई यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर कुटुंबीयांनी व स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमएच) उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले; मात्र प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने २२ जुलै रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
लक्ष्मीबाई नवघरे यांच्या पश्चात पती आणि तीन मुले असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (एडीआर) नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
