चाळीसगावला चारही बाजुंनी सुरक्षिततेसाठी चार पोलीस चौक्या सज्ज

0
4

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

गेल्या स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी चार पोलीस चौक्यांचे बांधकाम व नूतनीकरण कामाचे भूमिपूजन आ.मंगेश चव्हाण आणि जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या हस्ते केले होते. अवघ्या पाच महिन्यात चारही पोलीस चौक्यांचे काम पूर्ण करून प्रजासत्ताक दिनाच्या दोनच दिवसानंतर रविवारी, २८ जानेवारी २०२४ रोजी आ.मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे चाळीसगाव वासियांना आता पोलिसांचे चारही बाजुंनी सुरक्षा कवच मिळणार आहे.

चाळीसगाव आपले शहर, गाव, तालुका सुरक्षित ठेवण्यासाठी, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत असते. मात्र, पोलीस प्रशासनाला अपेक्षित असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार मिळाला तर काय बदल होऊ शकतो याचे एक चांगले उदाहरण चाळीसगाव शहरात घडले आहे. जळगाव जिल्ह्यातील एक महत्वाचे तसेच छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक या तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील चाळीसगाव शहर हे दळणवळणाचे मोठे केंद्र आहे. त्यामुळे साहजिकच शहराच्या सुरक्षा पाहणाऱ्या पोलिसांची जबाबदारी देखील वाढते.

चाळीसगाव शहरात पोलिसांना गस्तीसाठी व नागरिकांना तात्काळ मदतीसाठी असणाऱ्या नागद चौफुली व रेल्वे स्टेशन जवळील पोलीस चौक्या मोडकळीस आल्याने काही वर्षांपासून बंद होत्या. त्यामुळे पोलिसांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब चाळीसगाव मतदारसंघाचे आ.मंगेश चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी नागद चौफुली व रेल्वे स्टेशन जवळील जुन्या पोलीस चौक्यांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. तसेच चाळीसगाव शहराचे जकात नाके असणारे खरजई नाका व करगाव रेल्वे बोगदा येथे सुसज्ज अश्‍या दोन नवीन पोलीस चौक्या आमदार निधीतून बांधकाम करण्याचा संकल्प केला.

यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक अशोक नकाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंग देशमुख, शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती साहेबराव राठोड, देवयानी ठाकरे, ज्येष्ठ नेते वसंतराव चंदात्रे, उद्धवराव महाजन, राजेंद्र चौधरी, रवींद्र पाटील, संजय भास्करराव पाटील, संजय रतनसिंग पाटील, भाजपा शहराध्यक्ष नितीन पाटील, अविनाश चौधरी, सतीश पाटे, धनंजय मांडोळे, चिराग शेख, निलेश वाणी, मनोज गोसावी, ॲड.कैलास आगोणे, सोमसिंग राजपूत, सुभाष बजाज, अभय वाघ, सचिन दायमा, विवेक चौधरी, भावेश कोठावदे, पप्पूराज माळी, योगेश खंडेलवाल, राकेश बोरसे, प्रवीण मराठे, अजय वाणी, जितेंद्र पाटील, डॉ.प्रशांत एरंडे, रियाज प्रिन्स, विनोद घुमरे, दिनेश चौधरी, सचिन स्वार, हर्षल चौधरी, योगेश गव्हाणे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, परिसरातील व्यापारी, नागरिक उपस्थित होते.

यापूर्वी सर्व बीटचा कारभार हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या शहर पोलीस स्टेशन येथून चालत होता. शहरातील रहदारी व शहराचा झालेला विस्तार यामुळे मदत पोहचण्यास थोडा उशीर होताना दिसत होता. शहराच्या चारही बाजुंनी पोलीस चौक्या उभ्या राहिल्याने नागरिकांना पोलिसांची मदत आता हाकेच्या अंतरावर मिळणार आहे. ११२ ला फोन करून पोलिसांकडे मदत मागितल्यास तत्काळ जवळच्या पोलीस चौकीतून पोलिसांची मदत नागरिकांना मिळणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here