साईमत -अमळनेर- प्रतिनिधी |
येथील नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष वारंवार संपर्क साधूनही भेटत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नगरपरिषद कार्यालयात एक अनोखे आंदोलन करण्यात आले. नगराध्यक्ष कार्यालयात उपस्थित नसल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीलाच मागण्यांचे निवेदन चिटकवून शांततापूर्ण पद्धतीने आपला निषेध नोंदवला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दुर्गेश (डी.पी.) पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शहरातील युवक, महिला आणि प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
”नागरिकांना भेटायला वेळ नाही का?” – आंदोलनकर्त्यांचा सवाल
आंदोलनादरम्यान नगराध्यक्षांच्या या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. “लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. नागरिकांना भेटण्यासाठीच जर त्यांच्याकडे वेळ नसेल, तर ते योग्य नाही,” अशा भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या. हे आंदोलन कोणाचाही अवमान करण्यासाठी नसून, केवळ प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने करण्यात आल्याचे दुर्गेश पाटील यांनी स्पष्ट केले.
नगरपरिषद प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या सविस्तर निवेदनात प्रामुख्याने दोन महत्त्वाचे प्रश्न मांडण्यात आले आहेत:
१) अमरधाम (स्मशानभूमी) येथे अत्याधुनिक सोयी-सुविधा पुरवा:
अमळनेर येथील अमरधामच्या आधुनिकीकरणासाठी खालील सुविधा तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे:
सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षित वाहनतळ.
सुसज्ज शोकसभागृह, एलईडी दिवे, पंखे आणि सार्वजनिक स्वच्छतागृह.
लॉकर सुविधा आणि काँक्रीट पार्किंग.
बोअरवेलसह कायमस्वरूपी पाणीपुरवठा.
वृक्षारोपण, नियमित स्वच्छता, बसण्याची व्यवस्था आणि आकर्षक लँडस्केपिंग.
धार्मिक भजने व शांती मंत्रासाठी साउंड सिस्टीम.
२) प्रभाग क्रमांक ३ मध्ये गटारीचे बांधकाम करा:
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासोबतच पावसाचे व सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटार बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने:
अशोक बाबुलाल सोनवणे यांच्या घरापासून ते बापू सोमा भोई यांच्या घरापर्यंत गटार बांधणे.
दीपक रमेश भिल यांच्या घरापासून ते सौ. कलाबाई माधुकर पाटील यांच्या घरापर्यंत नवीन गटार तयार करणे.
”नगरपरिषद प्रशासनाने अमरधामच्या आधुनिकीकरणासह प्रभाग क्रमांक ३ मधील सांडपाण्याच्या प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा शहराध्यक्ष दुर्गेश (डी.पी.) पाटील यांनी दिला आहे.
या आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रविण (गुड्डू) संताजीराव देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी भूषण लोहार, चेतन पवार, चेतन पाटील, कुणाल पाटील, सागर पाटील, ललित पाटील, कुशल पाटील, विवेक निकुम, अविनाश कुंभार, चिन्मय पाटील, मोहीत शिंदे, सतिश पाटील, शरद पाटील, हर्षल शिंपी, मनिषा पाटील, कोमल पाटील, शोभाबाई मिस्तरी, ठगूबाई मराठे, राजश्री धनगर, भिकूबाई कोळी, ज्योती कुंभार, पार्वती मिस्तरी, ममताज रफिक, ऊषाबाई इदोरे, मंगळबाई पाटील, कलाबाई पाटील, मीनाक्षी पाटील, बापू भोई, सागर लांडगे, जिग्नेश पाटील, विशाल धनगर, हर्षल पाटील, जयेश पाटील, मनिष पाटील, पंकज पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
