२० हातगाड्या व टपऱ्या जप्त, मद्यपींना बसला आळा
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात वाढत्या अराजकतेवर अखेर प्रशासनाने कठोर पावले उचलत अतिक्रमण विभागामार्फत मोठी कारवाई केली. परिसरात उघड्यावर दारू पिणाऱ्यांचा वाढता वावर, महिलांना होणारा त्रास आणि टपऱ्या-हातगाड्यांच्या आड सुरू असलेल्या अवैध प्रकारांच्या तक्रारींनंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने धडक मोहीम राबवत तब्बल २० हातगाड्या व टपऱ्या जप्त केल्या. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
गेल्या काही दिवसांपासून गिरणा टाकी परिसरात सायंकाळनंतर मद्यपींचा मुक्त वावर वाढला होता. उघड्यावर दारू पिणे, गोंधळ घालणे आणि ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याच्या तक्रारी पोलीस प्रशासनाकडे पोहोचल्या होत्या. विशेषतः महिलांना आणि विद्यार्थिनींना या भागातून जाताना भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. टपऱ्या आणि हातगाड्यांच्या आडून काही अवैध हालचाली सुरू असल्याचीही चर्चा परिसरात होती.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी थेट हस्तक्षेप करत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याने पोलिसांनीही कठोर भूमिका घेत परिसरातील अवैध अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला.
पोलीस प्रशासनाच्या आदेशानंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक संपूर्ण तयारीनिशी गिरणा टाकी परिसरात दाखल झाले. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे हातगाडी व टपरीधारकांमध्ये एकच खळबळ उडाली. पथकाने अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेल्या टपऱ्या आणि हातगाड्यांवर थेट जप्तीची कारवाई करत परिसर मोकळा केला.
या मोहिमेदरम्यान तब्बल २० हातगाड्या आणि टपऱ्या जप्त करण्यात आल्या. जप्त केलेले साहित्य महापालिकेच्या ताब्यात घेण्यात आले असून, परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुढेही अशाच कारवाया सुरू राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक संजय ठाकूर यांनी सांगितले की, “परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शांततेसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. गिरणा टाकी परिसरातील अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”
या धडक कारवाईनंतर गिरणा टाकी परिसरात काही प्रमाणात शिस्त निर्माण झाली असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.
