साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
समतेचा, ममतेचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार संविधानाच्या माध्यमातून आपल्याला देऊन आपले जीवन सोन्यासारखे केले आहे. तसेच आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास आपल्याला डॉ.बाबासाहेब यांच्यामुळेच मिळाला आहे. अशा महामानव डॉ.बाबासाहेब यांच्यामुळे समाजाचे सोनं झाले आहे, असे प्रतिपादन अशांतभाई वानखेडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी भीमनगर येथून महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत महामानवांना अभिवादन करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. अरविंद कोलते, नगरसेवक राजू पाटील, माजी नगरसेवक अनिल बगाडे आदींनी महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी भीमनगर येथील मुलींची लेझीम पथकाने पांढरे शुभ्र वस्त्र व निळ्या फेट्याने मलकापूरकरांचे मने जिंकले. तसेच डीजे व ढोल ताशाच्या गजरात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीचा समारोप लायब्ररीच्या भव्य पटांगणावर करून जाहीर सभेते रूपांतर करण्यात आले. यावेळी यावर्षीचा समाजभूषण पुरस्कार एल.सी. मोरे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी माजी आमदार चैनसुख संचेती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवा तायडे, पंचायत समितीचे सभापती संजय काजळे, अलका झंनके, ॲड.मजित कुरेशी, यश संचेती, मोहन शर्मा, विजय डागा, विजय भालशंकर, विजय तायडे, राहुल तायडे, उल्हास शेगोकार, अनिल पैठणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातील प्लेबॅक सिंगर ई टीव्ही ‘गौरव महाराष्ट्राचा’ फेम श्रुती जैन नागपूर व निवेदिका प्रतीक्षा डांगे यांचा बहारदार भीम गीतांचा कार्यक्रम झाला.
यशस्वीतेसाठी समतेचे निळे वादळ संघटनेचे मोहन खराटे, दिलीप इंगळे, दीपक मेश्राम, अशोक जाधव, माजीद सरकार, इमरान शेख आदींनी केले. त्यावेळी सर्व जाती-धर्मातील धम्म उपासक, उपासिका तथा बाल बालिका उपस्थित होते. प्रास्ताविक ॲड.कुणालभाई वानखेडे यांनी केले.