मुंबई/दिल्ली :
दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि पोलिसांमध्ये झालेल्या मध्यरात्रीच्या झटापटीनंतर देशभरात आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत. विरोधकांसह अनेक सेलिब्रिटींनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असतानाच, आता या राजकीय वादात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा फडणवीस हिने उडी घेतली आहे. “सोशल मीडियावरील ट्रेंडला आंधळेपणाने पाठिंबा देऊ नका आणि केवळ ट्रेंड आहे म्हणून बंड करू नका,” असा रोकठोक सल्ला दिविजा फडणवीस यांनी तरुणांना दिला आहे.
जंतर-मंतरवरील झटापट : २० जुलै रोजी दिल्लीच्या जंतर-मंतरवर CJP च्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
देशभर पडसाद : या घटनेनंतर तरुणांचे आंदोलन अधिक तीव्र झाले असून विरोधी पक्षांनी या आंदोलनाला उघड पाठिंबा दिला आहे.
मूळ मुद्द्यापासून भरकटण्याचे संकेत : नीट पेपरफुटी आणि NTA च्या मुद्द्यावरून सुरू झालेले हे आंदोलन आता राजकीय आणि धार्मिक समीकरणांकडे वळत असल्याचा आरोप होत आहे.
”केवळ विरोध म्हणून द्वेष नको; विचारशक्ती गमावू नका”
“लोकशाहीतील विरोधी पक्षाने नेहमी देशाचे हित डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. केवळ सत्ताधारी पक्षाचा द्वेष किंवा बदनामी करण्याऐवजी देशाच्या विकासासाठी चांगले निर्णय घेण्यास मदत केली पाहिजे. सोशल मीडियात गाजणाऱ्या गोष्टींचे आंधळेपणाने समर्थन करू नका. कोणत्याही विचारसरणीच्या आहारी जाऊन स्वतःची विचारशक्ती गमावू नका.”
— दिविजा फडणवीस
’धार्मिक ध्रुवीकरण आणि राजकीय रंगापासून सावध राहा’
दिविजा यांनी पुढे स्पष्ट केले की, “जोपर्यंत विद्यार्थ्यांचे हित जपले जात होते, तोपर्यंत हे आंदोलन योग्य होते. परंतु ज्या क्षणी ही निदर्शने धर्माच्या मुद्द्याकडे वळतात किंवा नीट पेपरफुटी व NTA च्या मूळ विषयापासून भरकटतात, तेव्हा त्यामागचा उद्देश बदलतो. तरुणांनी कोणत्याही विषयावर मत बनवण्याआधी त्यामागची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. राजकीय मतभेद असले तरी एकमेकांना वैयक्तिक शत्रू समजू नये.”
दिविजा फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
