साईमत न्यूज नेटवर्क –
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनकर्ते अभिजीत दिपके यांची भेट घेतली. सोमवारी झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलन अधिक तीव्र झाल्याने या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
भेटीदरम्यान अभिजीत दिपके यांनी आंदोलनाच्या प्रमुख मागण्या शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. त्यांनी सांगितले की, सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना ताब्यात ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेणे, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि आंदोलनकर्त्यांवरील देशभरातील सर्व एफआयआर मागे घेऊन सोनम वांगचुक यांची मुक्तता करावी, या चार प्रमुख मागण्यांवर आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील सुमारे ३० जिल्ह्यांत कोणतेही अधिकृत आवाहन नसताना नागरिकांनी आंदोलनाला प्रतिसाद दिला. आंदोलन पुढे किती काळ सुरू राहणार असून आंदोलनकर्त्यांना कोणत्या प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे, याचीही त्यांनी विचारपूस केली.
त्यावर अभिजीत दिपके यांनी सांगितले की, ते गेल्या ३१ दिवसांपासून जंतर-मंतरवर आंदोलन करत आहेत. सोमवारी घडलेल्या घटनेनंतर सरकारबद्दल आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आंदोलनाचा मुख्य उद्देश धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान काही काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षांचा पाठिंबा वाढताना दिसत आहे. काँग्रेससह मनसे, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी आंदोलनाला समर्थन दर्शवले आहे. यापूर्वी संजय राऊत यांनी जंतर-मंतरवर जाऊन दिपके यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शरद पवार यांनीही आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनाच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा केली.
