साईमत न्यूज नेटवर्क –
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला दिवसेंदिवस अधिक धार येत असून, विविध विरोधी पक्षांचे नेते आंदोलनस्थळी भेट देत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी जंतर-मंतरवर जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जनंतर वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले आहे. या घटनेनंतर विविध विरोधी पक्षांनी आंदोलनाला उघड पाठिंबा दर्शवण्यास सुरुवात केली आहे.
मंगळवारी शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी जंतर-मंतरवर जाऊन आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली. तसेच केंद्र सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांशी अन्याय होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, सोमवारी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने परिस्थिती चिघळली होती. त्यानंतर आंदोलकांना आंदोलनस्थळावरून हटवण्यात आले. मात्र रात्री उशिरा पुन्हा मोठ्या संख्येने कार्यकर्ते जंतर-मंतरवर एकत्र येत घोषणाबाजी करत आंदोलन सुरू ठेवले. बुधवारी सकाळीही आंदोलन तीव्र झाल्याने पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली.
आंदोलनाला मिळणारा राजकीय पाठिंबा सातत्याने वाढताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात भूमिका मांडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही जंतर-मंतरवर भेट देत अभिजीत दिपके यांच्याशी चर्चा केली. आंदोलनासाठी कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असल्यास ती देण्याची तयारी असल्याचेही शरद पवार यांनी सांगितल्याची माहिती समोर आली.
संध्याकाळी आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला.
उद्या उद्धव ठाकरे आंदोलनस्थळी नेमकी कोणती भूमिका मांडणार आणि त्यांच्या भेटीनंतर या आंदोलनाला कोणते नवे राजकीय वळण मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
