अडावदला चिमणी दिनानिमित्त मोफत जलपात्राचे वितरण

0
3

साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर

पक्षी निसर्ग साखळीतील महत्त्वाचे घटक आणि वसुंधरेचे अलंकार आहेत. त्यांचे संवर्धन व संरक्षण खूप महत्त्वाचे आहे. या विचाराने नागरिकांना प्रेरित करण्यासाठी पक्षी, वन्यजीव व वन संवर्धनासाठी कार्यरत वन्यजीव अभ्यासक हेमराज पाटील यांनी जागतिक चिमणी दिनानिमित्त अडावद येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आणि कृष्णाजी नगर परिसरात यंदाही १०१ जलपात्रांसह इको फ्रेंडली घरट्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

कार्यक्रमात पक्षी अभ्यासक अश्‍विनी पाटील यांनी उपस्थितांना परिसरात आढळून येणाऱ्या सामान्य पक्षी व चिमण्यांची माहिती, त्यांची दिनचर्या व निसर्ग साखळीतील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. जलपात्र लावण्यासंबंधी मार्गदर्शन करून नियमित भरण्यासाठी नागरिकांना आग्रह केला. वनश्री दशरथ पाटील यांनी पक्षी व निसर्ग विषय घटकातून प्रबोधनपर माहिती दिली. संस्थेच्या सदस्यांनी परिसरातील घरोघरी जाऊन जलपात्र भेट देऊन नियमित भरण्यासाठी आवाहन केले. चिमणी संवर्धनाचा जागर वृद्धिंगत होत रहावा, सर्वांपर्यंत संदेश प्रत्यक्ष कृतीत यावा, यासाठी संस्थेकडून माहितीपूर्ण छापील पत्रक मोठ्या प्रमाणावर वितरित करण्यात आले.

यासाठी सर्व सदस्य, देवेंद्र बिऱ्हाडे, घनश्‍याम वैद्य, डॉ. लोकेश पाटील, आर्यदीप पाटील, कृष्णप्रिया पाटील, इमाम तडवी यांनी परिश्रम घेतले. यशस्वीतेसाठी सहाय्यक वन संरक्षक प्रथमेश हाडपे, वनपरीक्षेत्र अधिकारी प्रशांत साबळे, वनपाल योगेश साळुंखे, वाहन चालक योगेश सपकाळे यांचे सहकार्य लाभले. यावेळी अडावदमधील श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्रातील मिनाक्षी सपकाळे, आशा पाटील, वंदना पवार, निलीमा पाटील, अशोक लोहार, जितेंद्रकुमार शिंपी, सुनील पाटील, सुनील सोनार, रतिलाल पाटील, कैलास गुरव यांच्यासह सेवेकरी उपस्थित होते. पक्षी संवर्धनाचा यशस्वी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल यावल वन विभागाचे उप वनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here