‘क्रिमिनल डोजियर M.O.B’ मोहिमेला सुरुवात गुन्हेगारांची माहिती होणार ऑनलाइन
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि व्यापक मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील हिस्ट्रीशीटर्स, सराईत गुन्हेगार, टवाळखोर तसेच प्रतिबंधात्मक कारवाईतील आरोपींची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करण्यासाठी ‘क्रिमिनल डोजियर M.O.B डेटाबेस’ तयार करण्याची मोहीम शुक्रवार, २३ मे २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांची सविस्तर माहिती आता पोलिसांच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार असून, भविष्यातील गुन्ह्यांचा तपास अधिक वेगवान आणि प्रभावी होण्यास मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेंतर्गत संबंधित गुन्हेगारांना थेट पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडून विस्तृत स्वरूपातील ‘इंटर्रोगेशन फॉर्म’ भरून घेतले जात आहेत.
पोलिसांनी अत्यंत अभ्यासपूर्वक तयार केलेल्या या फॉर्ममध्ये गुन्हेगारांच्या वैयक्तिक, आर्थिक आणि सामाजिक आयुष्याशी संबंधित विविध माहितीचा समावेश करण्यात आला आहे. त्यात आरोपींचे कुटुंबीय, आधार व पॅन कार्ड तपशील, मालमत्तेची माहिती, वाहने व ती कोणाच्या नावावर आहेत, सोशल मीडिया अकाउंट्स, शारीरिक खुणा, टॅटू, मित्रपरिवार, पूर्वीचे गुन्हे व त्यांची सद्यस्थिती, गुन्हा करण्याची पद्धत, कार्यक्षेत्र, व्यसनाधीनता तसेच कर्जाची माहिती यांचा समावेश आहे.
या मोहिमेमुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेगारांची माहिती तातडीने शेअर करणे शक्य होणार आहे. त्यामुळे एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर संशयितांचा मागोवा घेणे आणि तपासाची दिशा निश्चित करणे अधिक सोपे होईल. फरार आरोपींच्या मालमत्तेचा तपशील उपलब्ध झाल्याने त्यांची मालमत्ता जप्त करण्यासह कठोर कायदेशीर कारवाई करणेही सुलभ होणार आहे.
याशिवाय, पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर नव्याने रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना स्थानिक गुन्हेगारांची माहिती मिळवण्यासाठी स्वतंत्र वेळ खर्च करावा लागणार नाही. डेटाबेसमधील माहितीच्या आधारे गुन्हेगारांचे नेटवर्क आणि हालचाली समजून घेणे अधिक सुलभ होणार आहे.
दरम्यान, या मोहिमेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे गुन्हेगारांचे सार्वजनिक खच्चीकरण. पोलीस स्टेशनच्या आवारातच ही प्रक्रिया जाहीरपणे राबवली जात असल्याने समाजात पोलिसांविषयी विश्वास निर्माण होण्यास मदत होत असून, गुन्हेगारांमध्येही मोठी दहशत निर्माण होत आहे. जिल्हा पोलिसांची ही डिजिटल आणि आक्रमक मोहीम आगामी काळात गुन्हेगारी नियंत्रणासाठी प्रभावी ठरणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
